दक्षिण रेल्वेसह (Southern Railway) अनेक रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर्समधील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ (E. coli) हे जीवाणू आढळले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 512 हून अधिक स्थानकांवर ‘कॅग’ने केलेल्या तपासणीबाबतचे वृत्त ‘पीटीआय’ने (PTI) दिलं आहे. या अहवालातून पाण्याची निकृष्ट गुणवत्ता आणि प्रवाशांसाठीच्या अपुऱ्या सुविधांबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
पीटीआय (PTI) च्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने स्थानकांवर प्रवाशांना असुविधा होऊ नये यासाठी काही नियम निश्चित केले होते, असे ‘कॅग’ला आढळून आले. मात्र, रेल्वेच्या विविध विभागांनी (झोन्स) या नियमांचे पालन केले नाही. परिणामी, प्रवाशांना योग्य सुवधा मिळाल्या नाहीत आणि त्रुटी निर्माण झाल्या. यामध्ये वॉटर कूलर्समधील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ची उपस्थिती आणि अस्वच्छ प्रसाधनगृहे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. तसंच, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही चिंताजनक बाबी समोर आल्या, ज्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण विहित मर्यादेबाहेर असणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता.
तसंच उपनगरीय नसलेल्या रेल्वे स्थानकांपैकी जवळपास 90 टक्के स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव होता असंही कॅग अहवालात नमूद आहे.
कोणत्या स्थानकांवर पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळले?
12 ऑगस्ट रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या ‘भारतीय रेल्वेमधील उपनगरीय नसलेल्या स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छता’ या विषयावरील अहवालात ‘कॅग’ने सहा विभागांमधील 59 स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची जिवाणूविषयक (bacteriological) तपासणी करण्यात आली नाही असं सांगितलं.
महाराष्ट्रातील किती स्थानकं?
सर्व विभागांमधील 512 उपनगरीय नसलेल्या स्थानकांवरील प्रवासी सेवांचा अभ्यास केल्यानंतर ‘कॅग’ने अहवालात नमूद केले की, “वॉटर कूलरमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ची उपस्थिती आढळली. ही स्थानके खालीलप्रमाणे आहेत: दक्षिण रेल्वे (SR) मधील दोन स्थानके (कोइम्बतूर आणि पालक्काड जंक्शन), दक्षिण मध्य रेल्वे (SCR) मधील एक स्थानक (हैदराबाद), मध्य रेल्वे (CR) मधील चार स्थानके (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा) आणि पूर्व रेल्वे (ER) मधील एक स्थानक (मधुपूर).”
अहवालात म्हटलं आहे की, “2022-23 मध्ये आठ विभागांमधील 49 स्थानकांवर आणि 2023-24 मध्ये नऊ विभागांमधील 56 स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील नळांमधून पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. नमुन्यांच्या चाचणी निकालांवरून ‘टोटल कोलिफॉर्म’ (Total coliforms) जीवाणूंची (ज्यामध्ये ‘ई-कोलाय’चाही समावेश आहे) उपस्थिती असल्याचं आढळलं”.
तसेच, ‘टोटल कोलिफॉर्म’ व्यतिरिक्त इतर जिवाणूविषयक चाचण्यांचे निष्कर्षही असमाधानकारक असल्याचे आढळून आले. यामध्ये 2022-23 मध्ये चार विभागांमधील आठ स्थानके आणि 203-24 मध्ये पाच विभागांमधील 11 स्थानकांचा समावेश होता. कॅगने (CAG) सांगितले की, या अहवालात 2019-20 ते 203-24 या कालावधीतील ‘टेस्ट ऑडिट’ दरम्यान आढळलेल्या बाबींचा, तसेच यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या प्रकरणांचा आणि आवश्यक तिथे 2023-24 नंतरच्या घटनांचाही समावेश आहे.
‘512 पैकी 458 स्थानकांवर सुविधांची कमतरता’
तपासादरम्यान निवडलेल्या 512 स्थानकांपैकी 458 स्थानकांवर किमान सुविधाही उपलब्ध नव्हत्या असं समोर आलं आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या 458 स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा (MEA) एकतर अजिबात पुरवण्यात आल्या नव्हत्या किंवा त्या विहित मानकांपेक्षा कमी दर्जाच्या होत्या.
“एप्रिल 2018 मध्ये, रेल्वे बोर्डाने (RB) NSG 1 ते NSG 6श्रेणीतील स्थानकांसाठी किमान आवश्यक सुविधा (MEA), शिफारस केलेल्या सुविधा (RA) आणि इष्ट सुविधा (DA) निश्चित करणाऱ्या सर्वसमावेशक सूचना जारी केल्या होत्या. रेल्वे बोर्डाने 31 ऑगस्ट 2018 पर्यंत सर्व स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा (MEA) सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते,” असे अहवालात नमूद केले आहे.
“रेल्वे बोर्डाच्या सूचनांनुसार (एप्रिल 2018), श्रेणीचा विचार न करता सर्व स्थानकांवर सर्वप्रथम किमान आवश्यक सुविधा (MEA) पुरवणे अनिवार्य करण्यात आले होते. यामध्ये पिण्याचे पाणी, प्रतीक्षा कक्ष, बसण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्मवरील शेड (आच्छादन), मूत्रालये, प्रसाधनगृहे, उंच प्लॅटफॉर्म, पंखे, पादचारी पूल (FOBs), कचरापेट्या, घड्याळे आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (PA सिस्टम) यांचा समावेश आहे,” असंही त्यात म्हटले आहे.
सीएसएमटी (CSMT), हावडा, सियालदह, नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल यांसारख्या ‘एनएसजी-१’ (NSG-1) श्रेणीतील स्थानकांवरही बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे (मूत्रालये आणि शौचालये), कचरापेट्या आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेन इंडिकेटर बोर्ड यांसारख्या सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले.
“एनएसजी-1 श्रेणीतील स्थानकांच्या तपासणीत (ऑडिटमध्ये) प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत त्रुटी आढळल्या; यामध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ (12 स्थानके), पंखे आणि वॉटर कूलर्स (प्रत्येकी आठ स्थानके) व दिशादर्शक फलक (पाच स्थानके) यांचा समावेश आहे,” असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘पॅसेंजर ॲमेनिटीज मॅनेजमेंट सिस्टम’चे (प्रवासी सुविधा व्यवस्थापन प्रणाली) विश्लेषण केल्यानंतर, अहवालात ‘एमईए’ (MEA) मानकांनुसार सुविधा पुरवण्यात त्रुटी असल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ, २०३ स्थानकांवर शौचालये, ४०३ स्थानकांवर मूत्रालये आणि २,०३५ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याचे नळ यांची कमतरता असल्याचे आढळले.
आपल्या प्रमुख शिफारशींमध्ये, ‘कॅग’ने (CAG) रेल्वेला अशी सूचना केली आहे की, “पाणी पुरवठा प्रणालीची तपासणी आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची सर्वसमावेशक चाचणी (ज्यामध्ये ‘युनिफॉर्म ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी प्रोटोकॉल’ अंतर्गतच्या सर्व निकषांचा समावेश असेल) यांबाबतच्या निर्धारित कार्यपद्धतींचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे.”
रेल्वे मंत्रालयाने घेतली दखल
रेल्वे मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वैष्णव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दिवसभर आढावा घेतला आणि पाणी गाळण्याच्या यंत्रणा (वॉटर-फिल्ट्रेशन सिस्टिम्स) बसवणे, पाण्याच्या टाक्या बदलणे व पाण्याची गुणवत्ता नियमितपणे तपासणे यांसारख्या अनेक उपाययोजनांचे आदेश दिले.
ई-कोलाय म्हणजे काय?
‘ई. कोलाय’ (Escherichia coli) हा दंडगोलाकार (रॉड-शेप्ड) जीवाणूंचा एक मोठा आणि वैविध्यपूर्ण गट आहे. यातील बहुतेक प्रकार (स्ट्रेन्स) निरुपद्रवी असतात आणि मानवांसह उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये राहून पचनक्रियेत मदत करतात. मात्र, काही हानिकारक प्रकारांमुळे अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग), मूत्रमार्गाचे संसर्ग आणि इतर आजार होऊ शकतात.
लक्षणं काय?
‘ई. कोलाय’ (E. coli) संसर्गाच्या पाच सामान्य लक्षणांमध्ये पोटातील तीव्र कळा, पाण्यासारखे किंवा रक्तामिश्रित जुलाब, मळमळ, उलट्या आणि सौम्य ताप यांचा समावेश होतो. दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यानंतर साधारणपणे तीन ते चार दिवसांनी ही लक्षणे दिसून येतात.
