सर्वात मोठी बातमी! नाशिक, रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा; कोणाची लागली वर्णी?

दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला तिढा अखेर सुटला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना नियुक्त करण्यात केले असून शासनाचे सहसचिव भ. बु. गावडे यांच्या सहीने पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणारा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे नेते तसा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाली असून रायगडचं पालकमंत्रीपद अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावलेंकडे सोपवण्यात आलं आहे.

रायगड पालकमंत्रिपद वाद

रायगडमध्ये पालकमंत्रिपदासाठी भरत गागवले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरेंमध्ये चाढाओढ सुरु होती. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर 2024 पासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात तीव्र संघर्ष सुरू होता. शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले (महाड) यांचा या पदावर दावा होता तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांच्या कन्या तथा मंत्री आदिती तटकरे यांनी या पदावर दावा केला होता. जानेवारी 2025 मध्ये आदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर झाली होती, पण शिवसेना कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे ती स्थगित करण्यात आली.  अदिती तटकरेंना विरोध करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. त्यांनी या मार्गावर टायर जाळले होते. या वादानंतर दीड वर्षांहून अधिक काळ पद रिक्त राहिल्यानंतर आज अखेर या पदावर गोगावलेंच्या नावाची घोषणा झाली.

विधानपरिषद निवडणुकीत कोकण जागा राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना शिवसेनेने मदत केल्यानंतर राजकीय समीकरण बदलले. वरच्या पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अनेकदा यासंदर्भात चर्चा झाली होती. अखेर भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा वाद

रायगडप्रमाणेच नाशिकमध्येही शिंदेंच्या शिवसेनेनं पालकमंत्रिपदावर दावा सांगितला होता. जानेवारी 2025 मध्ये भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री नियुक्ती जाहीर झाली होती, पण दुसऱ्या दिवशीच शिवसेनेच्या विरोधामुळे ती स्थगित करण्यात आली. शिवसेनेकडून दादा भुसे यांच्या नावाचा आग्रह धरला जात होता. 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे 10 हजार कोटींहून अधिक निधी हातळण्याचं आव्हान समोर असल्याने हे पद अत्यंत महत्त्वाचे बनले होते. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये चुरस वाढली आणि पद दीड वर्षांहून अधिक काळ रिक्त राहिले. यामुळे जिल्ह्यातील विकासकामे आणि नियोजन समितीच्या बैठका प्रभावित झाल्या. गिरीश महाजन हे कुंभमेळा संबंधित कामे पाहत असल्याने काही वेळा ‘अनधिकृत पालकमंत्री’ म्हणून उल्लेख होत असे, ज्यामुळे नवे वाद निर्माण होत होते. मात्र या कामाचा फायदा महाजनांना झाला. वरच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतर आज शासनाकडून महाजनांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *