कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली शहरातील शास्त्रीनगर रुग्णालयाचा अतिशय बेजबाबदार आणि भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची गर्भधारणा चाचणी करण्यात आली. एक दोन वेळा नव्हे तर तब्बल तीनदा पालकांची कोणतीही परवानगी न घेता ही चाचणी करण्यात आली. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाने केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचा अहवाल देण्यात आला. पण पालकांनी खासगी रुग्णालयात केलेल्या तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा दावा पालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षांची तरुणी इथे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं उपचारांसाठी दाखल झाली होती. ही मुलगी गर्भवती नसताना देखील त्या मुलीची शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाकडून प्रेग्नेंसी टेस्ट करण्यात आली. त्या तपासण्यांमध्ये मुलीची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली. प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजताच मुलीच्या घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला. मात्र त्यांनी बाहेर खाजगीरित्या या टेस्ट केल्या, त्यामध्ये प्रेग्नेंसी टेस्ट ही निगेटिव्ह आली. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाचा बेजबाबदार आणि भोंगळ कारभार उघडा पडला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या रुग्णालयातून परस्परांविरोधी अहवाल आल्याने पालकांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
या मुलीच्या पालकांनी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना ही सगळी माहिती दिली. म्हात्रेंनी स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून डॉक्टरांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली.
समिती गठित करण्यात आली
कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दिपा शुक्ल यांनी या प्रकरणी एक समिती गठीत केली आहे. त्यात जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, 30 जून ला 17 वर्षाची मुलगी डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झाली. त्यावेळी तिला मोठ्याप्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तिची तपासणी केली असता त्यात तिची यूपीटी तपासणी तीन वेळा केली गेली त्यात ती पॉझिटिव्ह आली. मात्र मुलीच्या आई वडिलांनी पुन्हा खाजगी रुग्णालयात तपासणी केली त्यात ती निगेटिव्ह असल्याचे समोर आले. आम्ही एक समिती गठीत केली आहे त्यात जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
