मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांच्या खिशात “५० ग्रॅम पावडर” (अमली पदार्थ) पेरुन त्यांना तस्करी प्रकरणात गोवण्याची धमकी पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने दिल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. त्यानंतर काही आठवड्यांतच आणखी एक कॉन्स्टेबल “५० ग्रॅम पावडर” – म्हणजेच एमडी (मेफेड्रोन) किंवा ‘म्याव-म्याव’ (ज्याची बाजारातील किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे) खरेदी करण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडला गेला.
विचित्र योगायोग म्हणजे, मालवणी पोलिसांनी त्या भागात सक्रिय असलेल्या एका अमली पदार्थ विक्रेत्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता, परंतु त्यांच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती खुद्द पोलीस दलातील निघाली. जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल किरण इंदुलकर यात अडकला.
विशेष म्हणजे, बीडीडी नायगावचा रहिवासी असलेला इंदुलकर यापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तिथून बदली होण्यापूर्वीच त्याचे अमली पदार्थांच्या टोळीशी असलेल्या संबंधाच्या संशयावरुन तपास सुरु होता.
कॉन्स्टेबल पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मालवणी पोलीस त्या भागात सक्रिय असलेल्या अमली पदार्थांच्या नेटवर्कमधील सदस्यांची ओळख पटवण्याचे काम करत होते.
“गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास, मालवणी पोलिसांनी एका संशयित अमली पदार्थ तस्कराला पकडण्यासाठी गेट क्रमांक ८ जवळ सापळा रचला. या नेटवर्कचा आणि त्यातील मुख्य पुरवठादारांचा पर्दाफाश करण्यासाठी, पोलिसांनी एका व्यक्तीला अमली पदार्थ विक्रेत्याच्या भूमिकेत उभे केले आणि खरेदीदार येण्याची वाट पाहिली,” असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईच्या विविध भागांत अमली पदार्थांची खरेदी-विक्रीसंबंधित व्यक्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिकारी त्या परिसरात तैनात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते; त्यानंतर इंदुलकर तिथे पोहोचला.
रंगेहाथ पोलिसांच्या जाळ्यात
“तो शुक्रवारी सकाळी त्या ठिकाणी आला आणि त्याने आमच्या माणसाकडे ५० ग्रॅम ‘एमडी’ची मागणी केली. अखेरीस त्याने १५ हजार रुपयांना ४ ग्रॅम ‘एमडी’ खरेदी केले. हा व्यवहार पूर्ण होताच, पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली” असे त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अमली पदार्थ खरेदी करण्याचा प्रयत्न करत असलेली ती व्यक्ती स्वतःच एक पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे जेव्हा तपास अधिकाऱ्यांना समजले, तेव्हा या कारवाईला अनपेक्षित वळण लागले.
पोलीस कॉन्स्टेबल किरण इंदुलकर याची सुमारे दोन वर्षांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. “त्यावेळी त्याला मालवणी परिसर आणि तिथे चालणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवसायाची माहिती होती. स्थानिक अमली पदार्थ तस्करांशी त्याचे लागेबांधे असल्याच्या तक्रारीही त्यावेळी समोर आल्या होत्या. त्याला त्याबाबत ताकीद देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची तिथून बदली करण्यात आली होती” असे त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या वर्तणुकीबाबतच्या तत्कालीन तक्रारींची किंवा शंकांची योग्य प्रकारे दखल घेतली गेली होती का, असा प्रश्न आता इंदुलकरच्या अटकेमुळे उपस्थित झाला आहे.
पूर्वीच्या निलंबनाबाबतही प्रश्नचिन्ह
अटकेनंतर इंदुलकर याच्या सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. “परवानगीशिवाय कर्तव्यावर गैरहजर राहिल्याच्या आरोपावरुन त्याला यापूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र नंतर ते निलंबन मागे घेण्यात आले. त्याला पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्यात आले,” असे सूत्रांनी सांगितले. तरीही त्याच्या वर्तणुकीबाबतच्या शंका कायम असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मालवणी पोलिसांनी इंदुलकरला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतील त्याचा कथित सहभाग हा अलिकडचा प्रकार आहे की तो दीर्घकाळापासून या रॅकेटचा भाग होता, याचा पोलीस तपास करत आहेत.
