वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्…; पुण्यातील हादरवणारी घटना

पुण्यातील (Pune) गणेश पेठ (Ganesh Peth) परिसरातील डुल्या मारुती चौकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडापाव (Vadapav) खरेदी करताना अनावधानाने एकमेकांच्या पायाला पाय लागल्याच्या किरकोळ वादातून एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवम परदेशी (वय 28) असे या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर वैभव साळुंखे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिवम आणि आरोपी वैभव हे दोघेही गणेश पेठ परिसरातच राहणारे असून त्यांची आपापसांत तोंडओळख होती. घटनेच्या दिवशी दोघेही डुल्या मारुती चौकातील एका वडापावच्या गाडीवर वडापाव खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे गर्दीत अनावधानाने एकाच्या पायाला दुसऱ्याचा पाय लागला.

या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद पेटला. वादाच्या भरात रागाच्या भरात असलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर जोरदार बुक्क्या मारल्या. या मारहाणीमुळे शिवमच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. गंभीर दुखापत झालेल्या शिवमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

घटना घडलेले आरोपी आणि पीडित हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आरोपी वैभव हा एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. तर विशेष म्हणजे, मृत शिवम आणि आरोपी वैभव या दोघांचेही वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. केवळ एका क्षणिक रागातून आणि किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे गणेश पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *