अमरावतीच्या अर्जुन नगर भागात दोन दिवसांपूर्वी एका थरारक घटनेने मोठी खळबळ उडाली होती. पोलीस दप्तरी फरार असलेला निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घराच्या दिशेने अज्ञात इसमानी दोन बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजही समोर आले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. निलंबित तलाठी ठाकरे यानेच हा सगळा प्रकार घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी दोन हल्लेखोर ठाकरे यांच्या घराकडे दुचाकीने आले होते. ते कोणाला दिसू नये ओळख पटू नये यासाठी संपूर्ण शरीर व चेहरा झाकून घेतला होता. त्यानंतर एकाने बंदूक काढून दोन गोळ्या गेटमधून घराच्या दिशेने मारल्या आणि हल्लेखोर लागलीच काही क्षणातच पळून गेले. हा संपूर्ण गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला होता. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर पोलिस तपासात धक्कादायक सत्य उघड झाले आहे.
निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासाच्या आत या थरारक घटनेचा पर्दाफाश केला केला असून विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घराच्या दिशेने फायर करण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली असून दुसऱ्या एका गुन्हात फरार असलेला विपुल ठाकरे यांचा धक्कादायक कारनामा पाहायला मिळाला आहे. न्यायालयात आपली बाजू मजबूत करण्यासाठी विपुल ठाकरे यांनी हा बनाव रचला असावा असा अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे.
विपुल ठाकरेवर कोणता गुन्हा नोंद?
विपुल ठाकरे याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण व फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता आणि त्याला निलंबितही करण्यात आले होते. दरम्यान या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आणि न्यायालयात आपली बाजू मजबूत करण्यासाठी आणि स्वतःवर जीवघेणा हल्ला झाल्याचे भासवण्यासाठी त्याने हा कट रचला होता.
