बाबो! परीक्षेत अडीच इंचाच्या मोबाइलद्वारे कॉपी, मुंबईच्या आयआयटी केंद्रातील प्रकार

भरती परीक्षेत अनेकदा कॉपी करण्याचे विविध प्रकार समोर येत असतात. अशातच मुंबईच्या आयआयटी केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या अशाच एका भरती परीक्षेत उमेदवारांनी चक्क अडीच इंचाच्या मोबाइलद्वारे कॉपी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी 25 ते 30 वयोगटातील चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला आहे.

रविवार 9 ऑगस्ट रोजी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या मल्टी-टास्किंग स्टाफ /ग्रुप-डी पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. यात गार्ड आणि शिपाई पदांचा सुद्धा समावेश होता. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई या ठिकाणी ही परीक्षात घेण्यात आली. यापैकी आयआयटी बॉम्बे, पवई केंद्रीय विद्यालयाच्या केंद्रावर एकूण 324 उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र यावेळी परीक्षेसाठी स्वतंत्र खोल्यांमध्ये बसलेल्या काही उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. यावेळी संबंधित पर्यवेक्षकांनी राकेश कुमार यांनी देवेंद्र सिंहची तपासणी केली. यावेळी त्याच्या खिशात मोबाईल हँडसेट आढळला. देवेंद्र सिंहने केंद्रातून पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पकडण्यात आले. तसेच इतर तीन वर्ग खोल्यांमधून भूप सिंह, रवी सिंह आणि रविंद्र सिंह या उमेदवारांना सुद्धा अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून सुद्धा मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.

अडीच इंचाच्या फोनमध्ये कोणती टेक्नॉलॉजि होती?

भरती परीक्षेच्या उमेदवारांकडून जप्त करण्यात आलेला एक हँडसेट हा अवघा अडीच इंचाचा होता. या उपकरणामध्ये केवळ कॉलिंगची सुविधा होती. सुमारे 700 रुपयांना हा हँडसेट वेगवेगळ्या पार्टचा वापर करून बनवण्यात आला होता. यात एआय इमेज आणि कॉलिंगची सुविधा होती अशी माहिती  मिळतेय. सध्या पोलीस विविध शक्यतांचा तपास करत असून आरोपींची या मोबाईलच्या माध्यमातून केंद्राच्या बाहेर कोणाशी संपर्क केला होता का? की उपकरणाचा गैर प्रकार करण्यापूर्वीच ते पकडले गेले याचा तपास उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात सुरु आहे. भरती परीक्षेत कॉपी करणाऱ्या या चार आरोपींना अंधेरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *