जगातील अनेक देशांमध्ये असलेल्या प्रसिद्ध ‘पॉपईज’ या प्रसिद्ध फ्रेंचायझीविरुद्ध (Popeyes) 14.31 कोटींचा दावा एका ग्राहकाने केला आहे. 14 कोटींहून अधिक रुपयांची नुकसानभरपाई आपल्याला देण्यात यावी अशी मागणी या ग्राहकाने केली आहे. पॉपईजच्या स्टोअरमधून विकत घेतलेल्या फ्राइड चिकनमध्ये ‘कंडोमसारखी गोष्टी’ आढळून आल्याचा आरोप या ग्राहकाने केला आहे.
कोणासोबत घडला हा प्रकार?
25 जुलै रोजी ह्युस्टनमधील ‘पॉपईज’च्या स्टोअरमधून चिकन खरेदी करणाऱ्या जस्टिन हॉवर्ड आणि डॅनियल मॅककिनॉन यांना हा धक्कादायक अनुभव आहे. या दोघांनी ‘पॉपईज’ची मालकी असलेल्या ‘रेस्टॉरंट ब्रँड्स इंटरनॅशनल’विरुद्ध खटला दाखल केला आहे. ‘पीपल’ मासिकाने कोर्टात 3 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये, हा अनुभव फारच धक्कादायक होता असं म्हटलं आहे. आम्हाला हे पदार्थ साधे वाटत होते. मात्र त्यात सापडलेली गोष्ट फारच भयंकर होती, असं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
सारा घटनाक्रम याचिकेत सांगितला
नेमकं झालं काय याची माहिती देताना याचिकेमध्ये घटनाक्रम नमूद केला आहे. “हॉवर्डने चिकनचा एक तुकडा चावला आणि त्याला लगेचच चिकनमध्ये अडकलेली, कंडोमसारखी दिसणारी एक वस्तू आढळली. यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही उत्तम भोजनाच्या अपेक्षेने आलेलो असताना हा अनुभव अधिक भयावह वाटू लागला,” असं याचिकेमध्ये नमूद केलं आहे. ‘कंडोमसारखी वस्तू दिसताच’ हॉवर्ड आणि मॅककिनॉन यांनी चिकन खाणं थांबवले. आम्हा दोघांना ‘मळमळू लागले,’ असेही त्यात म्हटले आहे. ती वस्तू दिसण्यापूर्वीच आपण दूषित अन्न खाल्ले असावे, या विचाराने आपण घाबरुन गेलो होतो, असे ग्राहकांनी सांगितले.
त्या वस्तूच्या माध्यमातून लैंगिक संक्रमित आजारचा संसर्ग झाला तर नसेल?
चिकनमध्ये आढळून आलेल्या कंडोमसारख्या त्या वस्तूच्या माध्यमातून पदार्थांवाटे शरीरात गेलेले बॅक्टेरिया, त्या वस्तूवर असेलले एखाद्याच्या शरीरातील द्रवपदार्थ, लैंगिक संक्रमित आजार किंवा इतर हानिकारक घटकांच्या संपर्कात आल्याच्या शक्यतेबद्दल आम्ही विचार करु लागलो, असंही या दोघांनी याचिकेत म्हटलं आहे. “ती वस्तू सापडण्यापूर्वीच आपण दूषित अन्न खाल्ले असावे, या शक्यतेने आम्ही हादरून गेलो,” असे याचिकेत म्हटले आहे. ग्राहकांना ती वस्तू नक्की काय होती, ती अन्नात किती काळ होती किंवा “संपूर्ण जेवणात दूषितपणा पसरला होता का?” हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे आम्ही हतबल झालो होतो, असंही याचिकेत नमूद केले आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक
टेक्सासमधील रहिवाशी असलेल्या जस्टिन आणि डॅनियलने पॉपईज आणि रेस्टॉरंटच्या मालकावर ‘गंभीर गैरवर्तन’ केल्याचा आरोप केला. अन्नात परकीय वस्तू जाण्यापासून रोखणे, स्वच्छतेचे नियम पाळणे आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे ‘सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने’ पाहणे यांसारख्या ‘मूलभूत सुरक्षा नियमांचे’ उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी याचिकेमध्ये केला.
‘पॉपईज’चं म्हणणं काय?
मात्र, ‘पॉपईज’ने हा आरोप फेटाळून लावला. “आम्ही आमच्या किचनमधील व्हिडिओ तपासले आहेत. मात्र अन्नातील कंडोमसारखी गोष्ट आमच्या पदार्थांमधून आल्याच्या दाव्याची पुष्टी करणारा कोणताही पुरावा आम्हाला आढळला नाही,” असे ‘पॉपईज’ने ‘पीपल’ला पाठवलेल्या ईमेमध्ये म्हटले आहे. हावर्ड आणि मॅकिनन आता 1.5 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
