गावात रुबाबासाठी नको ते केलं! एअर फोर्सचा जवान सांगून वर्दी शिवायला, टेलरमुळे बिंग फुटलं; पुण्यात तरुणानं शहीद जवानाचं आयकार्ड वापरलं

भारतीय हवाई दलाचा जवान असल्याचा बनाव करून फिरणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाचा पुण्यात पर्दाफाश झाला आहे. गावाकडे स्वतःचा रुबाब वाढवण्यासाठी त्याने हा खटाटोप केला होता. मात्र, लोहगाव परिसरातील एका सतर्क टेलरच्या प्रसंगावधानामुळे या तोतया जवानाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. शुभम विलास अंबुरे (वय 26, मूळ रा. बीड) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

लोहगावपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा पुण्यातील शिक्रापूर येथे एका सलूनमध्ये काम करतो. मात्र, आपण एअर फोर्समध्ये भरती झालो आहोत, अशी खोटी माहिती त्याने आपल्या गावी दिली होती. आपला हा खोटेपणा खरा वाटावा, यासाठी तो लोहगावच्या गुरुद्वारा कॉलनीतील ‘बालाजी टेलर’ येथे हवाई दलाचा गणवेश शिवून घेण्यासाठी गेला होता.

गणवेशाचं माप देत असताना टेलरला त्याच्या हालचालींवरून संशय आला. त्यांनी अधिक खातरजमा करण्यासाठी शुभमकडे ओळखपत्राची मागणी केली. शुभमने खिशातून आयकार्ड काढून दाखवलं खरं, पण नेहमी जवानांचे कपडे शिवणाऱ्या टेलरनं ओळखपत्रातील गडबड तात्काळ ओळखली. त्यांनी कोणताही विलंब न करता थेट लोहगाव पोलिसांशी संपर्क साधून या संशयित व्यक्तीची माहिती दिली.

निधन झालेल्या जवानाचं ओळखपत्र

माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या गंभीर प्रकाराची माहिती हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली. पोलीस आणि एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त चौकशीत शुभमनं आपण जवान नसल्याची कबुली दिली. या तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. 2022 मध्ये एका रेल्वे अपघातात निधन झालेल्या एका खऱ्या जवानाचं ओळखपत्र हा आरोपी स्वतःसाठी वापरत असल्याचं निष्पन्न झालं आहे. केवळ गावकऱ्यांवर छाप पाडण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचं त्यानं तपासात मान्य केलं. न्यायालयाकडून आरोपीला पोलीस कोठडी दिली असून लोहगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *