विक्रोळी दुहेरी हत्याकांड प्रकरणाला नवं वळण, ज्या घरात पिता-पुत्राचा मृत्यू झाला तेच घर…

मुंबईतील विक्रोळी (पश्चिम) येथील पार्कसाईट परिसरातील राहुल नगरमध्ये 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली होती. मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या वादातून सख्ख्या भावांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता. मात्र आता या प्रकरणाने भलतंच वळण घेतलं आहे. ज्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घरात दोन हत्या झाल्या त्या घराला आज पहाटे भीषण आग लागली आहे. मात्र ही आग लागली की लावण्यात आली, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी विक्रोळीतील पार्कसाइट येथे क्षुल्लक कारणावरुन सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा यांची त्यांच्या दोन भावांनी याचा घरात मारहाण करत हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी हे घरदेखील सील केले होते. मात्र आज या पहाटेच या घराला भीषण आग लागली आहे.

विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला भीषण आग लागल्यानंतर तिथे गॅस सिलेंडरचा स्फोटदेखील झाला आहे. आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल, पोलिस दाखल झाले. परंतु आगीत हे पूर्ण घर खाक झाले. मात्र हा योगायोग आहे की घातपात याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

दुहेरी हत्याकांडाची घटना काय?

विक्रोळी पार्कसाईट येथील राहुल नगर परिसरात पहाटे मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान दुहेरी हत्येत झाले होते. या घटनेत सुनील विश्वकर्मा (वय 40) आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला असून पत्नी अंजू विश्वकर्मा व धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा हे जखमी झाले आहेत.

पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत, प्राथमिक माहितीनुसार मोठ्या आवाजात संगीत लावण्यास आक्षेप घेतल्याने कुटुंबीयांमध्ये एकच कुटुंबातील दोन गटात वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांसह चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सुनील विश्वकर्मा आणि श्लोक विश्वकर्मा यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ ताब्यात घेऊन फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके चा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *