उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या एका छोट्याशा गावातून संदीपने आपल्या दोन लहान लेकरांना जवळ घेतलं आणि पत्नीच्या हातात थोडेसे पैसे ठेवले. ‘काळजी करू नकोस, महाराष्ट्रात रस्त्याचं काम आहे. दोन पैसे जास्त मिळतील, मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघेल. मी लवकरत परत येईल’, असं सांगून 30 वर्षांचा संदीप कुमार सोलापूरच्या जेऊर (ता. अक्कलकोट) गावाच्या दिशेने निघाला होता. त्याच्या डोळ्यात गरिबीवर मात करण्याची स्वप्नं होती आणि हातात रक्ताचं पाणी करून राबण्याची तयारी. पण नियतीच्या मनात काही औरच होतं.
नेमकी घटना काय?
1 ऑगस्ट 2026ला दुपारी संदीप कडक उन्हात रस्त्याचं काम करत होता. अचानक 12 वाजेच्या सुमारास सागर आणि दयानंद नावाच्या कामगारांसोबत त्याची काही कारणावरून भांडण झाली. पण निष्पाप मजुराच्या अगतिकतेचा फायदा घेत त्या दोघांनी संदीपवर अमानुष हल्ला चढवला. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुराला रक्तभंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. संदीप जीव वाचवण्यासाठी विनवण्या करत होता, पण त्या नराधमांचे हात थांबले नाहीत. तो जमिनीवर कोसळला, डोळ्यांसमोर अंधारी आली.
मृत्यूशी झुंज अखेर अपयश
स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संदीपला तातडीनं अक्कलकोटच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. पण जखमा इतक्या गंभीर होत्या की डॉक्टरांनी त्याला सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संदीप सात दिवस मृत्यूशी झुंज देत होता. प्रत्येक श्वासागणिक त्याला आपल्या पत्नीचा आणि दोन चिमुकल्यांचा चेहरा आठवत होता. ‘आपण नाही राहिलो तर त्यांच्या पोटाचं काय होईल’, हा विचार त्याच्या मनात सतत येत होता. पण 8 ऑगस्ट 2026 रोजी त्याच्या शरीरानं साथ सोडली. परराज्यातून पोट भरण्यासाठी आलेल्या संदीपची प्राणज्योत अखेर मालवली.
‘आम्ही गरिबीला कंटाळून कामासाठी आलो’
अक्कलकोट पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत. पण या कायद्याच्या प्रक्रियेत एका निष्पाप कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. प्रयागराजमध्ये वाट पाहणाऱ्या त्या माऊलीला काय सांगावं? हा प्रश्न आता सर्वांना पडलाय. संदीपच्या भावाचा अश्रूंचा बांध फुटला होता. ‘आम्ही गरिबीला कंटाळून कामासाठी आलो होतो, मार खाऊन मरायला नाही’. दोन मुलांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं आहे. संदीपने रस्त्याचं काम तर केलं, पण त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचा पुढचा रस्ता मात्र अंधारात ढकलला गेला.
