मुंबई लोकलचा आणखी एक बळी! 17 वर्षीय तरुणाचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू; दरवाजाला उभा असतानाच…

मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलमधून पडून 17 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे. लोकलच्या दरवाजात उभा असतानाच हात सुटल्याने खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेवर कळवा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मोहम्मद फाजील शफीक अन्सारी अशी त्याची ओळख पटली आहे.

मोहम्मद फाजील शफीक अन्सारी आपल्या मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी चालला असताना ही दुर्घटना घडली. फाजील हा भिवंडातील बाला पंपाऊंड परिसरातील रहिवासी होता. मुंबईला फिरण्यासाठी जायचं असल्याने त्याने भिवंडीहून कल्याण गाठलं होतं. फाजील आपल्या मित्रासोबत जात असतानाच ही दुर्घटना घडली.

फाजील मित्रासोबत ट्रेनच्या दरवाजात उभा होता. कळवा स्थानक आलं असता त्याचा दरवाजाचा हात निसटला आणि तोल जाऊन खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला मार लागला. प्रवासी खाली पडल्याची माहिती मिळताच आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

फाजीलच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फाजील कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. फाजीलच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर परिसरातही शोककळा व्यक्त होत आहे.

डोंबिवली ठाकूर्लीदरम्यान प्राणघातक हल्ला

डोंबिवली ठाकूर्लीदरम्यान रेल्वेच्या मालडब्यामध्ये दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सीएसएमटीवरून अंबरनाथ कडे जाणाऱ्या लोकलच्या मालडब्यामध्ये सीटवर बसण्यावरून आपआपसात वाद झाला. वादाचे रूपातर हाणामारीत झाल्याने यामध्ये राजू वाघे, साहिल संदारे हे दोघेजण जखमी झाले असून दोघांना कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने सायन हॉस्पिटलला हलवण्यात आले. याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल डब्यात महिलेला मारहाण

मुंबईच्या पश्चिम रेल्वेतील लोकल ट्रेनमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकलमध्ये झोपलेल्या एका महिलेला एका पुरुषाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कमरेतील पट्टा काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनमध्ये एक महिला झोपलेली असताना एक पुरुष तिच्याशी अर्वाच्य भाषेत बोलताना आणि कमरेतील पट्टा काढून धमकावताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, “लोकलमध्ये एखादी महिला झोपलेली असेल, तर त्यामागे काही कारण असू शकते. तिची तब्येत बिघडली असेल, पोटदुखीचा त्रास असू शकतो किंवा ती अत्यंत थकलेली असू शकते. अशा परिस्थितीत तिची विचारपूस करण्याऐवजी शिवीगाळ करणे आणि मारहाणीचा प्रयत्न करणे अत्यंत निषेधार्ह आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *