दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

 दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरातील बाबूरावनगर परिसरात घडली. पूजा राहुल गई असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पती राहुल गई यांनी केला आहे.

दुचाकीवरुन पडल्याने उजव्या हाताला दुखापत

मंगळवारी (चार ऑगस्ट) दुचाकीवरून जात असताना पडल्याने पूजा यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना बाबूरावनगर येथील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीनंतर त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले.

फ्रॅक्चरमुळे हातावर शस्त्रक्रियेचा डॉक्टरांचा सल्ला

त्यानुसार डॉक्टरांनी हातावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. गुरुवारी (सहा ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. सुमारे तीन तासांनी डॉक्टरांनी बाहेर येऊन पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शवविच्छेदनात नेमकं कारण समजणार

मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पूजाची बॉडी ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे शवविच्छेदन व अन्य तपासणीतून निष्पन्न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *