धरणीकंपामुळे घरांच्या थरारल्या विटा;नागरिकांत भितीचे वातावरण

पंधरा दिवसांपासून सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण व दिंडोरी या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणवणारे भूकंपाचे धक्के आता शहराच्याही उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. शनिवारी (दि. ८) रात्री १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसल्याने अवघे नाशिक शहर हादरून गेले. गंगापूररोड, महात्मानगर, जेलरोड, उपनगर, पंचवटी, म्हसरूळ, सिडको आणि आडगाव या परिसरांमध्ये सुमारे १० ते २२ सेकंदांपर्यंत जमीन थरथरण्यासोबतच इमारतींनाही हादरे बसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल

अचानक आलेल्या या धक्क्यामुळे शहरवासीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अनेक नागरिक तत्काळ इमारतींमधून खाली उतरून मोकळ्या जागेत जमा झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू

दिंडोरी तालुक्यातील भनवड-शिंदपाडा परिसरात जमिनीपासून सुमारे पाच किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. केंद्रबिंदू शहरापासून तुलनेने जवळ असल्याने त्याचे हादरे नाशिक शहराच्या अनेक भागांत स्पष्टपणे जाणवले. रात्रीची शांतता काही सेकंदांत भंगली आणि अनेक ठिकाणी इमारती हादरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

नागरिकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण

आतापर्यंत सुरगाणा, पेठ, कळवण आणि दिंडोरी या ग्रामीण भागांपुरतेच भूकंपाचे धक्के मर्यादित असल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरात त्याची प्रत्यक्ष जाणीव फारशी होत नव्हती. मात्र, शनिवारी रात्रीचा धक्का थेट शहरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीची वेळ असल्याने अनेकजण घरात झोपण्याच्या तयारीत होते. हादरे जाणवताच काहींनी घराबाहेर धाव घेतली. सोसायट्यांच्या आवारात, रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये काही काळ नागरिकांची गर्दी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *