डोंबिवली-सीएसएमटीच्या महिला डब्यात साप शिरल्याच्या अफवेने शुक्रवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल वाहतूक रखडली. साप शोधण्यासाठी सीएसएमटीपर्यंतच्या प्रवासात तब्बल चार वेळा विविध स्थानकांत लोकल थांबवण्यात आली. कुर्ला स्थानकात सर्पमित्राच्या मदतीने केलेल्या तपासणीनंतर ही अफवा असल्याचे लक्षात आले आणि लोकल सीएसएमटीला रवाना करण्यात आली. या गोंधळामुळे २० लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला.
महिला डब्यात साप असल्याची अफवा
सकाळी ८.४१ वाजता डोंबिवलीहून सीएसएमटीकडे रवाना झालेली धीमी लोकल ९.१४ वाजता ठाणे स्थानकात पोहोचली. फलाट क्रमांक चारवर आलेल्या लोकलमधील महिला डब्यात साप असल्याची अफवा उडाली. त्यामुळे डब्यातील महिलांनी आपत्कालीन साखळी ओढली आणि फलाटावरच गाडी थांबली. सुमारे १२ मिनिटांनंतर गाडीत तपासणी केल्यावर साप आढळला नाही. त्यामुळे गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर मुलुंड आणि नाहूर स्थानकांत अनुक्रमे दोन आणि चार मिनिटे गाडी थांबवण्यात आली.
