राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, काही भागांमध्ये अद्याप अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईसह उत्तर कोकणातील अनेक भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले, तरी उकाड्याचाही अनुभव येत आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने शनिवारी राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. नाशिक, नाशिक घाट परिसर, जळगाव, जालना, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि काही भागांत अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. पुढील काही दिवस मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे.
शनिवार-रविवारी वादळी पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आता वातावरणात पुन्हा बदल होण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीसह वायव्य बंगालच्या उपसागरात वातावरणीय बदलांची प्रक्रिया सुरू आहे. आकाशातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम देशातील विविध भागांतील पावसावर होण्याची शक्यता आहे.
ओडिशा, केरळ, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा
ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार?
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, १३ ते २० ऑगस्टदरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० ते २७ ऑगस्ट या कालावधीतही राज्यातील विविध भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
महाबळेश्वरमध्ये दमदार पाऊस
दरम्यान, सातत्याने पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत ८२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत तब्बल ५ हजार १६ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे.
