अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत पुण्यात लेखक अरविंद जगताप यांनी घेतली. पुण्यात मिळालेलं पहिलं रिजेक्शन, आवडतं स्ट्रीट फूड, पुढचं टार्गेट यासारख्या विविध विषयांवर मुंढेंनी दिलखुलास गप्पा मारल्या. पुण्याबाबत एक गमतीशीर गोष्ट म्हणजे तुम्ही एमए शिकायला आलात तेव्हा, पहिलं रिजेक्शन तुम्हाला मिळालं. विद्यापीठ हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही, असा प्रश्न अरविंद जगताप यांनी विचारला, तेव्हा तुकाराम मुंढे यांनी सविस्तर सांगितलं.
पुण्यातील पहिला अनुभव
“बीए झाल्यानंतर एमएला अॅडमिशन घेण्यासाठी मी पुण्यात आलो. एसटी महामंडळाच्या लालपरी बसने सकाळी उतरलो. त्याआधी पुण्याला कधीच आलो नव्हतो. शिवाजीनगर बस स्टँडला उतरलो. तिथून पायी विद्यापीठात गेलो, कारण काहीच माहिती नव्हतं. मी राज्यशास्त्र विभागात एमसाठी गेलो. तिथे अर्ज भरला, मार्कशीट दाखवली. तर स्टाफने सांगितलं की इथे प्रवेश मिळेल पण हॉस्टेल मिळणार नाही. चार पाच हॉस्टेल आधीच बुक झाली होती. मी म्हटलं की मी दुसरीकडे कुठेच राहू शकत नाही. मग ते म्हणाले, तुम्ही एसपी कॉलेजला प्रयत्न करा, बीएला मार्क्स चांगले असल्याने तिथेही प्रवेश मिळत होता. पण पुन्हा वसतिगृहाचा प्रश्न होता. त्यामुळे संध्याकाळच्या बसने घरी जायचं ठरलं. माझा पुण्याचा पहिला प्रवास बस स्टँड-विद्यापीठ-एसपी कॉलेज-बस स्टँड इतकंच झालं.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
घरापासून लांब राहण्याची अनामिक भीती
“पुढे अॅडमिशन झालं की नाही झालं, हॉस्टेल लागलं का याचाही मी विचार नाही केला. मी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला. यूपीएससी करताना एमए केलं. हॉस्टेलला किती जागा आहेत, किती मुलांनी अर्ज केला, असे काहीही प्रश्न मी विचारले नाहीत, कारण माझ्या मनात दुसरंच द्वंद्व सुरु होतं. बीए होईपर्यंत मी घराबाहेर कधी पडलो नव्हतो. गावाबाहेर होतो, पण त्यावेळच्या औरंगाबादला भावासोबत राहत होतो. कुटुंबातील व्यक्तींशिवाय स्वतंत्र कधी राहिलो नव्हतो. बीए झाल्यानंतरही एकटं, घरापासून दूर राहणार कसं, ही अनामिक भीती होती. यूपीएससीची तयारी करताना जयकर लायब्ररीत अभ्यास करत होतो. माझा एक मित्र पुणे विद्यापीठात राज्यशास्त्रात एमए करत होतो. त्याच्या रुमवर शेअरिंग बेसिसवर राहत होतो. तिथे ढेकणं इतकी होती, की झोपच यायची नाही. मी त्याला म्हटलं आधी सांगितलं असतं तर कधी आलोच नसतो. पुण्याशी माझी अशी ओळख झाली.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
