सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांच्या संथ गतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कुंभ कामांची सद्यःस्थिती समाधानकारक नाही. महिनाभरानंतर होणाऱ्या पुढील आढावा बैठकीपर्यंत गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसलीच पाहिजे,” असा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी यंत्रणेला दिला.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशांतून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि समन्वयाच्या कामांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
