पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं

विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या छळाच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत, मात्र या घटनेतील क्रूरतेने माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. केवळ चारित्र्यावर संशय घेऊन एका गरोदर विवाहितेला तिच्या पतीने आणि सासूने चक्क ‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडलं आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, पुणे पोलिसांनी या प्रकरणाची तत्परतेनं दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात

या धक्कादायक प्रकरणाबाबत एका 22 वर्षीय पीडित महिलेनं पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे काळेपडळपोलीस ठाण्यात या क्रूर घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही कालावधीतच पीडितेच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली होती. या निराधार संशयातून त्याने तिला सातत्यानं अमानुष मारहाण केली तसेच तिचा अतोनात मानसिक व शारीरिक छळ केला. संशयाचं भूत एवढं मानगुटीवर बसलं होतं की, त्याने पत्नीच्या वेदनांची पर्वादेखील केली नाही.

‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडलं

यात सगळ्यात हादरवून टाकणारी बाब म्हणजे, पीडिता गरोदर होती. गरोदरपणाच्या या अत्यंत नाजूक अवस्थेत कुटुंबाकडून आधाराची आणि प्रेमाची अपेक्षा असते. मात्र, या प्रकारणात परिस्थिती पूर्णपणे उलट होती. गरोदर असतानाही सासरच्या मंडळींच्या डोळ्यांत कोणतीही दयामाया दिसली नाही. त्यांनी संगनमत करून आणि बळजबरी करून या महिलेला ‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडले. एका आईच्या आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या निरागस बाळाच्या जिवाशी खेळण्याचा हा भयंकर प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.

आरोपींवर गुन्हे दाखल

या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आहेत. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी पती प्रतीक पिंगळे (वय 27) सासू वंदना सुनील पिंगळे (वय 45, दोघेही मूळ रहिवासी अक्कलकोट) या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या काळेपडळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुण्यात घडलेल्या या भयानक प्रकारामुळे कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सासरच्या छळाचं हे टोक गाठणारं प्रकरण समाजातील विकृत मानसिकतेचं दर्शन घडवणारं असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *