वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एक मन हेलावून टाकणारी तथा संतापजनक घटना समोर आली आहे. भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली. आरोपी जवानाचं नाव ज्ञानेश्वर मदने (वय 28) असून तो 6व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत आहे.
ज्ञानेश्वरचे बाहेर अनैतिक संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जवानाचं दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, ज्यावरून घरात नेहमी वाद होत होते. काल दुपारी आरोपीने आपल्या पत्नीच्या मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील माहेरच्या लोकांना फोन करून दीपाली घरात पडल्यानं तिला रुग्णालयात दाखल केल्याची खोटी माहिती दिली. संध्याकाळी दीपालीचे कुटुंबीय कारंजा येथे पोहोचले असता त्यांना दीपालीच्या शरीरावर संशयास्पद खुणा आढळल्या.
यानंतर मृत महिलेचा भाऊ राहुल माने याने तात्काळ कारंजा शहर पोलीस ठाण्यात जाऊन मेहुण्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. अनैतिक संबंधांमुळे दीपालीचा सतत छळ केला जात होता आणि त्याच कारणावरून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी सांगितलं की, ‘पोलिसांनी आरोपी जवान ज्ञानेश्वर मदने याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत’.
