अडीच तास वेटिंग, नाराज सुवर्णपदक विजेता निघून गेला; राज ठाकरेंकडून दिलगिरी, म्हणाले गावित आल्याचं कुणी कळवलंच नाही

 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना बोलावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडीच तास भेट दिली नसल्याचा दावा केला जात होता. मात्र दिलीप गावित भेटायला येणार आहेत, याची आपल्याला कल्पनाच नसल्याचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे. मात्र तरीही भेट होऊ न शकल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राज ठाकरे म्हणाले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच हा गैरसमज दूर केला.

राज ठाकरे काय म्हणाले?

“मी एका गोष्टीचा खुलासा करु इच्छितो, काल आपले एक खेळाडू दिलीप गावित येऊन गेले. मी बातम्या पाहिल्या. महत्त्वाचा भाग म्हणजे, त्यांना कोणी बोलावलं हे मला माहिती नाही, ते आलेत, हेही मला कुणी सांगितलं नाही. त्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही, असं का करेन मी? मला माहितीच नसलेल्या गोष्टींवर बातम्या आल्या. त्यांचाही काही गैरसमज झाला, की ते दोन तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही. परंतु मला माहितीच नव्हतं, मला कुणी सांगितलंच की ते आलेत म्हणून” असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं.

“मला जर कुणी सांगितलं असतं, तर निश्चित मी त्यांना भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलावलं, मला कुणी सांगितलं का नाही, हा भाग बाजूला सोडा, पण भेट नाही झाली आणि त्याबद्दल ते नाराज झाले, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. ते दिल्लीला गेले आहेत. ते परत आल्यावर मी नक्कीच त्यांची भेट घेईन आणि या गोष्टी सांगेन. तुमचाही काही संपर्क झाला, तर त्यांच्या कानावर या गोष्टी घाला, की मलाच काही माहिती नव्हतं, त्यामुळे न भेटण्याचा काही विषयच येत नाही.” असा खुला राज ठाकरे यांनी केला.

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची नाराजी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा खेळाडू दिलीप गावित व त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना राज ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवल्याचा निरोप दिल्याचं बोललं जात होतं. मात्र, भेट ठरलेली असतानाही त्यांना अडीच तास बसवून ठेवण्यात आल्याचं समोर आलं होतं. वेळ वाया गेल्याने प्रशिक्षक काळे व दिलीप गावित नाराज झाले. ‘भेट द्यायची नव्हती, तर मग बोलावले कशाला?’ असा उद्विग्न सवाल उपस्थित करत ते तेथून निघून गेले.

दोघेही निघून जात असल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित मनसे पदाधिकारी कोंबडे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा आणि त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु वैतागलेले गावित व काळे यांनी थांबण्यास स्पष्ट नकार दिला. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. मात्र देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूला ताटकळत ठेवणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *