तुम्ही आतापर्यंत समुद्रातील लाटांचा रौद्र अवतार पाहिला असेल. नदीमध्ये किंवा खाडीमध्येही कधीतरी लाटांसारखा पाण्याचा प्रवाह दिसून येतो. मात्र हे फारच क्वचित होते. असं असलं तरी कधी विहिरीमध्ये अशा लाटा दिसल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. पण सध्या असा एक विचित्र प्रकार समोर आला असून संपूर्ण भरलेलं ग्लास हलवल्यानंतर त्यामधील पाणी ज्याप्रमाणे हलतं तसं विहिरीमधील पाणी हलत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. या मागील खरं कारण आता समोर आलं असून नेमका हा काय प्रकार आहे जाणून घेऊयात.
सदर घटना मागील पाच दिवसांपासून साधारणपणे 2 ऑगस्टपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विहिरीमधील पाणी जोरजोरात हलताना दिसत असून आजूबाजूला उभे असलेले लोक आश्चर्याने त्याकडे पाहत आहेत. ही विहीर गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वीरपारडा गावात आहे. ही विहीर सुमारे 18 फूट खोल आहे. स्थानिक शेतकरी प्रांजीवन सादरिया यांच्या मालकीच्या शेतात ही विहीर असून या शेताला लागूनच राष्ट्रीय महामार्ग आहे.
आजूबाजूच्या विहिरींमधील पाणी मात्र शांत
सदर चर्चेत असलेली विहीर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बांधण्यात आली आहे. मात्र या विहिरीची सध्या संपूर्ण पंचक्रोषीत चर्चा असून इंटरनेटवरही विहिरीच्या व्हिडीओनं धुमाकूळ घातलाय. या विहिरीमध्ये असलेलं पाणी एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जोरजोरात हलताना दिसत आहे. जणू काही समुद्राच्या लाटाच विहिरीत तयार होत असल्यासारखं जोरजोरात या विहिरीमधील पाणी हलताना दिसतंय. मात्र त्याचवेळी याच परिसरामधील इतर विहिरींमधील पाणी मात्र शांत आहे. या विहिरीमधील हे पाणी पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. काहींनी भूकंपांची शक्यता व्यक्त केली आहे तर काहींनी यामागे एखादी अलौकिक गोष्टी शंका व्यक्त केली होती.
तज्ज्ञांचं म्हणणं काय?
मात्र या विहिरीतील पाण्याच्या गूढ हलचालीसंदर्भात तज्ज्ञांचे मत वेगळेच आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना, जिल्हा भूशास्त्रज्ञ जे.एस. वधेरा यांनी, “ही भूकंपजन्य घटना नाही किंवा भूकंपाची चाहुलही नाही. गांधीनगर येथील भूकंपीय संशोधन संस्थेनेही इंस्टीट्यूट ऑफ सिसमोलॉजिकल रिसर्चने परिसरात सक्रिय फॉल्टलाइन नसल्याचे सांगितले आहे.
पाणी का हलतंय?
तज्ज्ञांच्या मते यामागील मुख्य कारण म्हणजे जोरदार पावसामुळे भूजल स्तर बदलत असतो. खडकांच्या छिद्रांमध्ये अडकलेली हवा बाहेर पडत असल्याने पाण्यात अशा लाटा तयार होत आहेत. रस्त्याजवळील वाऱ्याचा प्रभावही यात योगदान देऊ शकतो. याला वैज्ञानिकदृष्ट्या ‘वेल सीच’ विहिरीतील दोलन म्हणजेच विहिरीतील पाणी हलत राहण्याची क्रिया असं म्हणतात.
