ज्या वडिलांनी तीन्ही मुलींसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्याच बापाचे अंत्यदर्शन घेण्याचाही वेळ लेकींकडे नव्हता. ही घटना घडलीये हरियाणातील सोनिपत येथे. वृद्धाश्रमात राहणाऱ्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी मुलींना याबाबत माहिती दिली. मात्र तिन्ही मुलींनी आम्हाला वेळ नाही असं सांगत अत्यसंस्कार उरकून घ्या, असं म्हटलं. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर वडिलांचे अत्यंदर्शन घेतले. ज्या वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलींसाठी खर्ची घातले, त्यांना असा निरोप मिळाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मोठे कपडा व्यापारी असलेले शिवचरण गु्ता हे गेल्या तीन वर्षांपासून सोनिपत येथील वृद्धाश्रमात त्यांच्या पत्नीसोबत राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि तेव्हापासून ते एकटचे राहत होते.
गुप्ता यांचे मंगळवारी 3.30 च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वृद्धाश्रमातील प्रशासनाने त्यांच्या तिन्ही मुलींना याची माहिती दिली. पण मुलींनी सोनीपतला येण्यास नकार दिला. इतकंच नव्हे तर, त्यांनी प्रशासनाला अत्यसंस्कार करुन घेण्यास सांगितले. तसंच, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी वडिलांचे शेवटचे दर्शन घेतले. त्याचबरोबर अत्यंविधीचे फोटो व व्हिडिओदेखील पाठवण्यास सांगितले.
वृद्धाश्रमाचे प्रशासक आनंद कुमार यांनी म्हटलं आहे की, गुप्ता त्यांच्या मुलींसोबत फोनवर दररोज बोलायचे. मात्र ते आजारी पडल्यानंतर मुलींचे फोन कमी येऊ लागले. गुप्ता गेल्या 20 दिवसांपासून आजारी होते. तेव्हा मुलींना सांगण्यात आले होते. मात्र एकही मुलगी त्यांना बघायला आली नव्हती
गुप्ता यांच्या निधनानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा मुलींशी संपर्क साधला होता. मात्र तेव्हाही त्या आल्या नाहीत. या उलट त्यांनी वृद्धाश्रमालाच अत्यसंस्काराची तयारी करायला सांगितली. अत्यंसस्कार होत असताना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला. वडिलांचे शेवटचे दर्शनदेखील तिन्ही मुलींनी व्हिडिओ कॉलवर घेतले.
गुप्ता यांची मोठी मुलगी अनिता ही नेपाळला राहत असून ती शिक्षिका आहे. तिने वृद्धाश्रमाला पाच हजार पाठवून अत्यसंस्कार करण्यास सांगितले. अत्यसंस्कार झाल्यानंतर मुलींनी व्हिडिओदेखील पाठवायला सांगितले. इतकंच नव्हे तर, अत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या लोकांनी हे देखील ऐकलं की, या सगळ्या प्रकाराला आणखी किती वेळ लागेल? आम्हाला जेवण करायचंय आणि आंघोळदेखील करायची आहे.
गुप्ता यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य तिन्ही मुलींच्या संगोपनात घालवले. त्यांचे शिक्षण नीट व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली. त्यांच्या दोन मुली शिक्षिका आहेत. मोठी मुलगी अनिता नेपाळला राहते तर निशा उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये तर लहान मुलगी प्रिया मुंबईत राहते. तिन्ही मुलींचे लग्न झाले असून त्यांचं कुटुंब आहे. ट
गुप्ता यांच्या तिन्ही मुलींना त्यांच्या अस्थींबद्दल विचारलं असता. त्यांनी ते नंतर पाहुयात असं म्हणत तिथेच ठेवण्यास सांगितले. आम्हाला आता वेळ नाही असं म्हणत नंतर पाहुयात. किंवा तुम्ही अस्थी गंगेत विसर्जन कराल का? अशी विनंतीदेखील केली.
