कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील उपचारांबाबत आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. अडीच वर्षीय मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आलं. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर त्याची सुई मुलाच्या कमरेतच राहिल्याचं एक्स-रे काढल्यानंतर लक्षात आलं. ऑपरेशन करून मुलाच्या कमरेतून सुई काढण्यात आली आहे. कुटुंबीयांनी मुलाची तपासणी करून एक्स-रे काढल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी अमित कोलेकर यांनी संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यभान पांडे आणि त्यांची पत्नी काजल पांडे दोघे आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आले होते. मुलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलाला रेबिजचे इंजेक्शन दिलं. मात्र, इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेतराहिली. आई काजल पांडे यांनी सांगितलं की, ‘इंजेक्शनची सुई बाहेर आलेली नाही. मात्र डॉक्टरांनी सांगितलं की, ती इकडे तिकडे पडली असेल, तुम्ही मुलाला घेऊन जा’. थोड्या वेळानंतर मुलाला त्रास होऊ लागला. आई-वडील मुलाला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले असता त्याठिकाणी देखील त्यांना आधीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुलाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अडकलेली सुई ऑपरेशन करुन काढण्यात आली. या प्रकरणात मुलाच्या आई-वडिलांनी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. ‘आमच्या मुलासोबत झालं, दुसऱ्या मुलासोबत असा प्रकार व्हायला नको’, असं त्यांनी म्हटलं आहे.
