सात महिन्यांचा संसार, पतीचं टोकाचं पाऊल, घाबरुन पत्नीनेही मृत्यूला कवटाळलं, पण शेवटी मोठा ट्विस्ट

उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका नवविवाहित जोडप्याच्या सात महिन्यांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट झाला. सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पतीने विष प्राशन केले, तर पत्नी राहत्या घरात छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विवाहितेचा खून, माहेरच्या मंडळींचा आरोप

पती सागर साहू याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर झाशी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर त्याची पत्नी राधा हिचा जागीच मृत्यू झाला. राधाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिची हत्या केली, मात्र तिने आयुष्य संपवल्याचा बनाव रचण्यासाठी तिला छताला लटकवले, असा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. ही घटना बबीना शहरातील गणेश मंदिर परिसराजवळ घडली.

मृत्यूपूर्वी पती-पत्नीचा जोरदार वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि राधा हे नुकतेच मध्य प्रदेशातील अशोकनगर येथून आले होते. सोमवारी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला, मात्र या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाद झाल्यानंतर सागरने विष प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला बबीना येथील आरोग्य केंद्रात नेले.

पतीवर आयसीयूत उपचार

डॉक्टरांनी त्याला प्रथमोपचार दिले आणि प्रकृती गंभीर असल्याने झाशी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला झाशीतील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तो आयसीयूत उपचार घेत आहे.

पत्नीचा राहत्या घरी गळफास

सागरला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीय बाहेर गेले असताना राधा घरीच थांबली होती. नातेवाईक परत आले, तेव्हा ती छताला ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळली. बबीना पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी घटनास्थळी पोहोचून कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली. प्राथमिक तपासानंतर तिची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली.

लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली नसल्यामुळे, कायद्यानुसार या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीतून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबांच्या संमतीने प्रेमविवाह

राधाच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, सागर आणि राधा यांचा विवाह २५ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला होता. लग्नापूर्वी ते एकमेकांना ओळखत होते आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला होता. मात्र राधाच्या नातेवाईकांनी सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला आहे. तिच्या काकांनी दावा केला की, १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि ती रक्कम उभी करता न आल्याने तिच्यावर दबाव टाकला जात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *