मुंबईतील निर्जन जागी समलिंगी डेट, अचानक टोळकं आलं, कपडे उतरवून व्हिडिओ काढले, 31 वर्षीय तरुणाची लूट

डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटायला गेला असताना एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील देवनार भागात ३० जुलै रोजी ही घटना घडली. पीडित तरुणाला या टोळीने आधी कपडे काढायला भाग पाडले, मारहाण केली, धमकावले आणि ५० हजार रुपये लुटून पोबारा केला.

समलिंगी डेटिंग अॅपवर ओळख

देवनार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. तो शिवाजी नगर येथील रहिवासी असून त्याचे कार्यालय वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स(बीकेसी) येथे आहे. ३० जुलै रोजी एका डेटिंग ॲपवर त्याची एका व्यक्तीशी ओळख झाली; दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि काही काळ चॅटिंग केल्यानंतर देवनारमधील एका निर्जन ठिकाणी भेटण्याचे ठरवले.

टोळक्याने चाकूच्या धाकाने लुटलं

“समलिंगी अॅपवर भेटलेल्या तरुणासोबत असतानाच काही अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवला आणि कपडे काढण्यास सांगितले. त्याने कपडे काढल्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली, त्याचे फोटो व व्हिडिओ काढले आणि पैसे न दिल्यास अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ऑनलाइन बँक ट्रान्सफरद्वारे तरुणाकडून ५० हजार रुपये उकळल्यानंतरच आरोपी तिथून निघून गेले, असेही पोलिसांनी सांगितले.

प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ च्या कलम ११५ (दुखापत करणे), १२७ (बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे), ३०९ (लूट), ३११ (मृत्यू किंवा गंभीर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासह केलेली लूट किंवा दरोडा) आणि ३५१ (गुन्हेगारी स्वरुपाची धमकी) तसेच ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेटिंगला भेटलेला तरुणही सहभागी असण्याची शक्यता

“प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, तक्रारदारासोबत भेटायला आलेली व्यक्तीही या गुन्ह्यात सहभागी होती. ही व्यक्ती आणि इतर आरोपी डेटिंग ॲप्सवर पुरुषांशी मैत्री करायचे आणि त्यांना डेटसाठी बोलावून धमकावणे, मारहाण करणे व लुटणे असे प्रकार करायचे. समलिंगी म्हणून ओळख उघड होईल या भीतीपोटी पीडित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करणार नाही, अशी त्यांना अपेक्षा असायची, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *