पोलिसांकडून आरोपींना मारहाण आणि गैरवर्तनाचे कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याबरोबरच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चौकशी केली. राज्य मानवी हक्क आयोगाने नियुक्त केलेल्या समितीत जिल्हा न्यायाधीश दर्जाचे रजिस्ट्रार, पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी विश्वास पांढरे आणि अन्य एका सदस्याचा समावेश आहे. समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भेट देऊन संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तीन अल्पवयीन संशयितांना पोलिस वाहनावर बसवून आणत असताना एका महिलेने त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याआधी दुसऱ्या एका प्रकरणात काही आरोपींना गुडघ्यावर बसवून भर रस्त्यातून फिरविल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या.
या पार्श्वभूमीवर मानवी हक्क आयोगाने स्वतःहून दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. समितीने घटनांशी संबंधित सर्व बाबींची पडताळणी केली असून, वस्तुस्थितीचा अहवाल आयोगाकडे सादर केल्यानंतर संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कायदेशीर; तसेच प्रशासकीय कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीही या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेऊन अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे या चौकशीची जबाबदारी दिली आहे.
दरम्यान, राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीस महासंचालकांना दिलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांची भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
