स्तनदा मातांनी स्वत:चं 1200 लीटर दूध दान करुन वाचवला 7000+ बाळांचा जीव; मुंबईतल्या हॉस्पिटलची कौतुकास्पद कामगिरी

मुंबईमधील एक मिल्क बँक नवजात बालकांना जीवनदान देण्याचं काम करत असून या मिल्क बँकच्या माध्यमातून तब्बल सात हजारांहून अधिक बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे ज्या बाळांना वाचवण्यात यश आलंय त्यामध्ये प्रीमॅच्युअर बाळांबरोबरच अतिदक्षता विभागातील बाळांचाही समावेश आहे.

कुठे आहे ही मिल्क बँक?

ज्या मिल्क बँकबद्दल आपण बोलतोय ती मिल्क बँक महिला व बालकांसाठी असलेल्या कामा रुग्णालयात आहे. या मिल्क बँकने मागील तीन वर्षांत स्तनदा मातांच्या मदतीने या मिल्क बँकने 1200 लिटरहून अधिक मानवी दूध संकलित केलं. या दुधाच्या मदतीने 7 हजारांहून अधिक नवजात बालकांना जीवनदान मिळालं असून प्रीमॅच्युअर आणि एनआयसीयूमधील बाळांसाठी हे दूध संजीवनी ठरतंय.

बाळांना या दुधाची अशीही होतेय मदत

या मिल्क बँकमुळे बाळांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली असून कृत्रिम दूधावरील अवलंबून राहण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. दात्या मातांचे दूध नवजात बालकांमध्ये संसर्गाचा धोका कमी करण्यास, वजनवाढीस चालना देण्यास आणि मृत्यूदर कमी करण्यास महत्त्वाचे ठरत असल्याचं इथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे सर्वाधिक गरजू नवजात बाळांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा या मिल्क बँकमुळे मिळतोय.

दूध सुरक्षित असल्याची खात्री करुन घेतली जाते

कामा रुग्णालयातील ही ह्यूमन मिल्क बँक अधिष्ठाता डॉ. जितेंद्र देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आणि मेट्रन निरुपमा डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. दुधाच्या गुणवत्तेची खात्री केली जाते, असे प्रशासनाने सांगितले. दान करण्यात आलेल्या दुधाची काटेकोर तपासणी, पाश्चरायझेशन आणि सुरक्षित साठवणूक केल्यानंतरच ते नवजात बालकांना दिले जाते. गरजू नवजात बालकांना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी स्तनदा मातांनी पुढे येऊन दुग्धदान करावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

दूध संकलनात सातत्याने वाढ

सन 2023 ते 2025 या कालावधीत कामा रुग्णालयाच्या ह्यूमन मिल्क बँकेतील दूध संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 मध्ये 273.070 लिटर, 2024 मध्ये 415.661 लिटर आणि 2025 मध्ये 520.918 लिटर मातेचे दूध संकलित करण्यात आले. या दूध संकलनात सातत्याने वाढ होत असून स्तनदा मातांच्या दातृत्वामुळे मुलांना जीवनदान मिळण्यास मदत होत आहे. अधिक अधिक स्तनदा मातांनी पुढे येऊन या कार्यास हातभार लावला तर अधिक बालकांना जीवनदान देणं शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *