‘मातोश्री’वर पदाधिकाऱ्यांचा राडा, संध्याकाळी ठाकरेंच्या रणरागिणीचा राजीनामा, पक्षाला दुहेरी झटका?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी (3 ऑगस्ट) घडली. त्याच दिवशी संध्याकाळी वैशाली दरेकर-राणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ‘मातोश्री’वरील वादाची पार्श्वभूमी वैशाली यांच्या राजीनाम्यामागे आहे का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई करण्यात आली होती. संबंधित प्रकार नेमका आहे? हे जाणून घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केलेले पदाधिकारी आणि ठाणे, कळव्यातील इतर पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावलं होतं.

‘मातोश्री’वर काय घडलं?

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर बैठक सुरु असताना कल्याणमधील पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरुन वाद झाल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली. नव्या नियुक्त्यांबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शाब्दिक बाचाबाची झाली.

पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु झालेला वाद पाहून उद्धव ठाकरे भडकले. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांचं उदाहरण देत आल्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलं. मातोश्रीच्या बैठकीत कल्याण आणि ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांमधील वादाचं वृत्त ताजं असतानाच कल्याणच्या महिला जिल्हा संघट वैशाली दरेकर-राणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

वैशाली दरेकर-राणे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवताना जोरदार प्रचार केला होता. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी निडरपणे आपला प्रचार केला होता. या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नव्हतं. पण तीन लाख मतं खेचून आणण्यात वैशाली दरेकर-राणे यांना यश आलं होतं. पण आता लोकसभा निवडणूक लढलेल्या वैशाली दरेकर-राणे यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Vaishali Darekar Rane

 

वैशाली दरेकर-राणे राजीनाम्यात काय म्हणाल्या?

वैशाली यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. “मी वैशाली दरेकर-राणे महिला जिल्हा संघटक या पदावर दोन वर्षांपासून कार्यरत आहे. परंतू सध्या माझ्या वैयक्तिक कर्तव्यांमुळे मी सदर पक्षास न्याय आणि वेळ देऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या महिला जिल्हासंघटक या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे. त्याचा स्वीकार करावा. ही विनंती”, असं वैशाली दरेकर-राणे आपल्या पदाच्या राजीनाम्याच्या पत्रात म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *