हॅलो कंट्रोल रुम, इथे बॉडी पडलेय… पोलीस पोहोचताच वेगळंच चित्र, दोन महिन्यात दोन फेक कॉल, पण तीच बीटमार्शल असल्याने संशय

‘हॅलो… पोलिस नियंत्रण कक्ष? सातपूरमध्ये मर्डर झालाय… रक्ताच्या थारोळ्यात एकजण पडलाय, लवकर या!’, असा फोन पोलिस यंत्रणेच्या ‘डायल ११२’वर धडकतो आणि सातपूर पोलिसांच्या हद्दीत तातडीने ‘अलर्ट’ जातो. पथके ‘सायरन’ वाजवून तातडीने धाव घेतात पण, तिथे कोणताही ‘क्राइम सीन’ नसतो. हा दोन महिन्यांत दुसऱ्यांदा घडलेला प्रकार असून, सातपूर हद्दीत ‘फेक मर्डर’चे कॉल करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फेक कॉल प्रकरणी गुन्हा

सातपूर पोलिस ठाण्यातील अंमलदार नीलेश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार ‘फेक कॉल’ देणाऱ्या संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २१७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोकसेवकाला त्रास देण्याच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे हा ठपका त्याच्याविरुद्ध ठेवण्यात आला आहे.

पोलिसांची वाहनं दुकानात धडकली

रविवारी (दि. २) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास ‘डायल ११२’वरून नियंत्रण कक्षात मिळालेल्या माहितीनुसार सातपूर पोलिस ठाण्यात फोन खणाणला. टाउन बीटमार्शलच्या ‘एमडीटी’वर खून झाल्याबाबतचा ‘कॉल फ्लॅश’ झाला. रस्त्यावरील वाहने बाजूला करीत थरारक चित्रपटाप्रमाणे पोलिसांची वाहने सातपूर एमआयडीसीतील ऑटोमोबाइलच्या दुकानात धडकली. आजूबाजूच्या नागरिकांची चौकशी सुरू झाली. मात्र, तिथे ना रक्ताचे डाग होते, ना कोणती गर्दी, ना कोणाची बॉडी!

पोलिसांची चेष्टा, संशयिताविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी परिसरातील काही व्यक्तींना विचारल्यानंतर ‘साहेब, येथे तर सगळे शांत आहे. कोणताही राडा झालेला नाही’, अशी माहिती दिली. पोलिसांनी ‘कॉल’ आलेल्या क्रमांकावर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत शासकीय यंत्रणेचा वेळ वाया घालवून पोलिसांची चेष्टा करणाऱ्या त्या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला.

तीच बीटमार्शल असल्याने संशय

२४ मे रोजीही रविवार होता. सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास ‘एमडीटी’वर खून झाल्याबाबतचा ‘कॉल’ प्राप्त झाला होता. त्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या बंदोबस्तात पोलिस व्यस्त होते. तातडीने पोलिसांनी धाव घेतली. मात्र, तेथे काहीच नव्हते. तेव्हाही एका मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. यावेळी ‘बीटमार्शल’ तीच असल्याने तेथील तरुण किंवा विक्षिप्त, मद्यपींपैकी कोणीतरी खोडसाळपणा करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *