ठाण्यातील महत्त्वकांक्षी रिंग रोड प्रकल्पाचा विस्तार, या तीन शहरांनाही जोडणार? कसा असेल हा प्रकल्प

ठाण्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळं आता या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला वेग आला आहे. केंद्राकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यावेळी त्यांनी ठाणे रिंग रोड मेट्रोचा कळवा ते मुंब्रा-दिव्यापर्यंत विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत त्यांनी काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली आहे

ठाणे रिंग रोड प्रकल्पात कळवा-मुंब्रा-दिव्यापर्यंत विस्तार करण्यात येण्याची शक्यता आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी बैठकीत सांगितले की, कळवा,मुंब्रा आणि दिवा हे भाग वेगाने विकसित होत आहेत. या भागांचा मूळ आराखड्यात समावेश नाहीये. त्यामुळं या भागानांही मेट्रो सेवेशी जोडण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. त्यावर यासाठी आवश्यक डीपीआर तयार असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रताप सरनाईकांनी सुचवला नवा पर्याय

हा मेट्रो मार्ग समता नगर, लोकमान्य नगर, आई माता मंदिर या मार्गे शिवाई नगरकडे पुढे न्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याद्वारे या बैठकीत करण्यात आली. तसे केल्यास या भागातील १ लाख नागरिकांना या मेट्रोचा लाभ मिळू शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर याबाबत आधीचा मार्ग आणि या नवीन मार्गाची तुलना करून कोणत्या मार्गाने नागरिकांना जास्त फायदा होईल तसेच कोणत्या मार्गावरून मेट्रो गेल्यास कमीत कमी नागरिक बाधित होतील याचा ३ आठवड्यात अभ्यास करून सादरीकरण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महारेल प्राधिकरणाला दिले.

कसा असेल प्रकल्प?

ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दररोज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि गतिमान होण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आली होती. 12 हजार 200 कोटींच्या निधीला यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पातील 26 किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरून तर नव्या आणि जुन्या ठाणे स्टेशनला जोडणारा 3 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असणार आहे. या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत 9.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर मेट्रो स्टेशन आणि कास्टिंग यार्डचे काम प्रगतीपथावर आहे. ही मेट्रो रायलादेवी येथे मेट्रो मार्ग 4 ला तर बाळकुम नाका येथे मेट्रो मार्ग ५ ला जोडली जाणार आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातून जुन्या आणि प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे स्टेशनकडे येणे अधिक सोपे होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत या प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *