MPSC टॉपर, तरी DCM जिल्हा दौऱ्यावर असताना लाचेची मागणी, 45 लाख घेताना सापडला; क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

45 लाख रुपयांची लाच घेताना बीडमधील एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे. सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या श्रीनिवास लखमावाड या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून अटक केली आहे.

एमपीएससी परीक्षेच्या निकालात प्रथम

जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असतानाच घडलेल्या या धाडसी लाचखोरीनं संपूर्ण प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पालकमंत्र्यांची बैठक आटोपून घरी गेल्यानंतर घरात लाचेची रक्कम स्वीकारताना हा लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकला. विशेष म्हणजे, हे महाशय 2016च्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात राज्यात एसटी प्रवर्गात पहिले आले होते.

वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात एका तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बीडमध्ये सापळा रचला. यावेळी 5 लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित 40 लाखांच्या मनोरंजनाच्या (खोट्या) नोटा स्वीकारताना श्रीनिवास लखमावाड याला रंगेहात पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *