मुंबईमध्ये आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी भटकंतीचा विचार असेल आणि ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पुढील दोन दिवस वेगवेगळ्या काळात पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सेवा बंद किंवा स्थगित असणार आहेत. त्यामुळेच मुंबई लोकलने प्रवास करुन मुंबई भटकंतीचा किंवा काही कामानिमित्त शहरात येण्याचा विचार असेल तर रेल्वेने जारी केलेल्या काही वेळा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात…
आजची स्थिती काय?
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात व विविध अभियांत्रिकी देखभालीच्या कामांसाठी रविवारी, 2 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर आज म्हणजेच, शनिवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असून रविवारी कोणताही ब्लॉक नसणार. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल-माहीम अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. रात्री 12.25 पासून सुरु होणारा हा मेगाब्लॉक 4.25 पर्यंत असेल. या ब्लॉकमुळे चर्चगेट-सांताक्रूझ स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मध्य रेल्वेवरही ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा – मुलुंडदरम्यान ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील उपनगरी रेल्वेगाड्या माटुंगा स्थानकात धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या रेल्वेगाड्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील या गाड्या मुलुंड-माटुंगादरम्यान व माटुंगा स्थानकात पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बरवरही ब्लॉक; 20 मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल
हार्बर मार्गावरही ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. सकाळी 11.10 ते 4.10 दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वेसेवा रद्द करण्यात येईल. तसेच वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात पनवेल/बेलापूर/वाशी येथून येणार आहेत. त्याचप्रमाणे सीएसएमटीकडे येणाऱ्या, तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेसेवाही बंद राहणार आहेत. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक 8) दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी सुमारे 20 मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल चालवण्यात येतील.
