डोंबिवली डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रेला मुंबई उच्च न्यायालयाने तपास अद्याप पूर्ण न झाल्याने जामीन नाकारला आहे. आरोपींची ओळख परेड, साक्षीदारांचे जबाब तसेच आवाजाचे नमुने घेणे अद्याप बाकी असल्याने दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला. आता पुढील सुनावणी 6 ऑगस्टला ठेवण्यात आली आहे. यामुळे नगरसेवक रमेश म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. तपास अद्याप बाकी असल्याने तत्काळ जामीन देता येणार नसल्याच मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला 9 जुलैला अटक झाली होती
तपास दोन आठवड्यांत पूर्ण करणार, पोलिसांचं आश्वासन
पोलिसांनी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याच्याविरोधातील तपास वेगाने करु असं आश्वासन मुंबई हायकोर्टात दिलं आहे. दोन आठवड्यांत तपास पूर्ण केला जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं आहे. त्यामुळे आता पोलीस तपासानंतर अहवालात काय येतं हे पाहावं लागणार आहे.
कोर्टात काय घडलं?
रमेश म्हात्रेचे वकील आबाद पोंडा यांनी कोर्टाकडे कठोर अटी घालून सुटका केली जावी अशी विनंती केली. इतकंच नाही तर तपास होईपर्यंत रमेश म्हात्रे महाराष्ट्राबाहेर राहण्यास तयार आहे असंही सांगण्यात आलं. मात्र न्यायिक मित्र आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे बाजू मांडणारे वरिष्ठ वकील एस. यू, कामदार यांनी जामीन देण्यास विरोध केला.
नेमकी घटना काय?
6 जुलै रोजी डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा एका पुरुष आणि महिला डॉक्टरने नवजात बाळाच्या नातेवाईकांना बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. रुग्णालयातील नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग (NICU) पूर्णपणे भरलेला असल्याने त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितलं. नवजात बाळाला योग्य वैद्यकीय काळजी मिळणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर नातेवाईकांनी रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला आणि ते आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचल आणि डॉक्टरांना अपशब्द वापरत मारहाण केली.
अटकेचा घटनाक्रम, सध्या न्यायालयीन कोठडीत
6 जुलैला मारहाण झाल्यानंतर या घटनेचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यानंतर रमेश म्हात्रेविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली. दोन दिवसांनी अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पण अटकेनंतरही पोलीस त्याला सन्मानपूर्वक वागणूक देत असल्याने नाराजी व्यक्त केली होती. 14 जुलै रोजी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त होऊ लागल. अखेर मुंबई हायकोर्टाने स्वतःहून दखल घेत 18 जुलैला जामीन आदेशाला स्थगिती दिली तसंच रमेश म्हात्रेला सरेंडर होण्याचा आदेश दिला. सरेंडर केलं नाही तर संपत्ती जप्त केली जाईल असं कोर्टाने सांगितलं होतं. न्यायालयाच्या आदेशानुसार म्हात्रेने शरणागती पत्करली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
