कामासाठी बाहेर निघाले, दोन्ही लेक गेल्याची बातमी आई-बापाच्या कानावर; रेल्वेच्या धडकेत सख्ख्या भावांचा हृदयद्रावक अंत

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी घडलेल्या एका हृदयद्रावक रेल्वे अपघातात सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे रुळाजवळ असताना भरधाव रेल्वेची धडक बसल्यानं हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे सावनेर शहरासह परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सावनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मृतकांची ओळख निरंजन लक्ष्मण फिरके (वय 40) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय 37, रा. सावनेर) अशी झाली आहे. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास सावनेर परिसरातील रेल्वे मार्गावर दोनजण रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना अंकित हांडे यांनी दिली. त्यानंतर बनसोड यांनी तातडीने सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दोन्ही भावांना रेल्वे रुळावरून बाहेर काढून सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केलं. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भाऊ रेल्वे रुळाजवळ असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेची धडक त्यांना बसली. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, ते रेल्वे रुळ ओलांडत होते की अन्य काही कारणामुळे ही दुर्घटना घडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून सर्व शक्यतांचा तपास केला जात असून रेल्वे प्रशासनाकडूनही आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे.

अपघाताचे नेमके कारण काय?

या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. रेल्वे रुळ ओलांडताना किंवा रेल्वे मार्गाजवळ वावरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *