चिमुकलीच्या पोटावर 12 चटके; मेळघाटात पोटदुखीसाठी अघोरी उपचार, 65 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा

पोटदुखीचा त्रास दूर करण्याच्या नावाखाली १५ दिवसांच्या नवजात बालिकेच्या पोटावर गरम विळ्याने चटके देण्यात आल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथे घडली. या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी ६५ वर्षीय महिलेविरुद्ध अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?
गावातील एका २१ वर्षीय महिलेला १५ दिवसांपूर्वी कन्यारत्न झाले. बालिकेचे पोट फुगत असल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यान, गावातील भुलाई जामुनकर (वय ६५) ही महिला बालिकेच्या घरी गेली. तिने पोटदुखीवर ‘डम्मा’ ही पारंपरिक उपचारपद्धती करण्याचा आग्रह धरला. बालिकेच्या आईने याला विरोध केला. मात्र, हा विरोध डावलून जामुनकर हिने चुलीवर तापवलेल्या विळ्याने बालिकेच्या पोटावर एकापाठोपाठ १२ चटके दिल्याचा आरोप आहे.

चिमुकलीची तब्येत बिघडली
या प्रकारानंतर बालिकेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चिखलदरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रवीणकुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *