भयंकर! गर्भवती महिला उभी असतानाच प्रसुती, बाळ तीन फुटांवरुन खाली कोसळले

महिलेच्या गर्भशयातून बाळ अडीच ते तीन फुटांवरुन जमिनीवर कोसळले असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. तसंच, बाळ गंभीर जखमी असून NICU सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील डॉक्टर,  नर्सेस च्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप महिलेने केला आहे.

विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करत संतापजनक घटना समोर आली आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटातील नवजात बालक प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे . या अपघातानंतर  नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ठाणे येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिलेला बुधवारी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे संगितले. मात्र रुग्णालय प्रशासनाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे.

याचदरम्यान,  महिला उभी असताना तिच्या गर्भाशयातून नवजात बालक थेट अडीच ते तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडले. या अपघातात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने ठाणे येथील एनआयसीयूमध्ये हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान या रुग्णालयाचे डॉक्टर जोगळेकर यांना या प्रकरणाबाबत विचारणा करायचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेटणे टाळले . त्यामुळे या प्रकरणाची पालिका आयोग्य विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *