पुण्याकडून निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, बसचा चक्काचूर

सोलापूर शहरात ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालक आणि एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास 10 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापुरातील शेळगी परिसरात पहाटे 5 च्या सुमारास झाला. एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय 43, रा. चिवरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि नागुबाई राम रेवगे (वय 48 रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर प्रवाशांच्या बॅगा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याकडे ही बस जात होती. पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास बस सोलापूर एसटी स्टॅण्डवर पोहोचली. त्यानंतर सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळगीजवळ हा भीषण अपघात झाला.

ट्रकला एसटी बसची मागून धडक

कुरकुंभहून निघालेल्या एसटी बसने साळईने भरून निघालेल्या ट्रकला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. सोलापूर बस स्थानकातून उमरगा (एम एच 14 एल बी 0380)(जिल्हा धाराशिव) कडे निघाली असता पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद सोलापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे:

1. रामचंद्र प्रभाकर देवघे (वय वर्ष 57 राहणार अंदुर जिल्हा धाराशिव )
2. विकास प्रकाश पाटील (वय वर्ष 32 राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा )
3. माणिक नागप्‍पा वायचळ (वय वर्ष 54 राहणार तांदूळवाडी तालुका दक्षिण सोलापूर )
4. रामलिंग ब्रह्मानंद कापसे (वय वर्षे चाळीस राहणार धाराशिव )
5. अभिषेक दीपक चव्हाण (वय वर्ष 25 राहणार उमरगा धाराशिव )
6. अनिकेत सुभाष राठोड (वय वर्ष 30 राहणार सातारा )
7. अभिजीत अरुण चव्हाण (वय वर्ष 44 राहणार नळदुर्ग जिल्हा धाराशिव )
8. नागोराव किस्तू तोडसांग (वय वर्ष 37 राहणार किणवर परभणी )
9. अनुराधा अर्जुन चव्हाण (वय वर्ष 60 राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव )
10. तुलसीदास मनोहर पाचंगे (वय वर्ष 49 राहणार गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *