सोयाबीन तेलापासून बनवायचे तूप अन् पनीर! अमोल डेअरीवर FDAची धाड; 3 लाखांहून अधिकचा साठा जप्त, अधिकारीही अचंबित

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात थेट अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत चिकलठाण एमआयडीसी परिसरातील ‘मेसर्स अमोल दूध डेअरी’वर छापा टाकून नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलापासून बनावट गाईचे तूप, क्रीम आणि ॲनालॉग पनीर तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. एफडीएच्या पथकानं या ठिकाणी धाड टाकून तब्बल 3 लाख 12 हजार 380 रुपयांचा दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे.

गैर-खाद्य सोयाबीन तेलाचे 10 ते 12 बॅरल्स जप्त

गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट नंबर सी-45 येथील ‘मेसर्स अमोल दूध डेअरी’ (मालक दामोदर केदार) या उत्पादन युनिटवर मध्यरात्री छापा टाकला. झाडाझडती दरम्यान पथकाला येथे 10 ते 12 ‘नॉन-फूड ग्रेड’ सोयाबीन तेलाचे बॅरल्स आढळून आलं. या सोयाबीन तेलाचा वापर चक्क बनावट गाईचं तूप, क्रीम आणि पनीर बनवण्यासाठी केला जात असल्याचं तपासात स्पष्ट झालं.

एफडीएने या डेअरी युनिटमधून खालीलप्रमाणे तब्बल 950 किलोचा साठा जप्त केला आहे:

सुट्टे तूप : 299 किलो (किंमत 1,67,440)
सुट्टी साय/क्रीम : 199 किलो (किंमत 55,720)
पनीर : 174 किलो – 35 ब्लॉक्स (किंमत 45,240)
रिफाइंड सोयाबीन तेल : 278 किलो (किंमत 44,480)

‘लक्ष्मी डेअरी’च्या 3 रिटेल दुकानांवरही धाड

तपासात धक्कादायक बाब समोर आली की, हे अमोल दूध डेअरी शहरातील प्रसिद्ध ‘लक्ष्मी डेअरी’च्या तीन मुख्य रिटेल काऊंटर्सना (टीव्ही सेंटर एरिया, कामगार चौक आणि दर्गा रोडवरील श्रीराम चौक) या भेसळयुक्त तूप व पनीरचा पुरवठा करत होती. एफडीएनं तातडीनं या तिन्ही दुकानांवर धाडी टाकून तेथील अन्न नमुने घेतले आणि 29 हजार 300 रुपये किमतीचे 41 किलो गाईचे तूप जप्त केलं.

परवाना तत्काळ निलंबित, आस्थापना केली बंद

नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अमोल दूध डेअरीचा अन्न सुरक्षा परवाना एफडीएनं तत्काळ प्रभावाने निलंबित केला असून ते उत्पादन युनिट पूर्णपणे सील करून बंद करण्यात आलं आहे. ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे, सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील आणि सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *