गेल्या १० वर्षांपासून सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडमुळे मुंबईकरांना मोठा फायदा झाला आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांदरम्यान सिग्नल-मुक्त प्रवासासाठी या लिंक रोडचा वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. कलानगर जंक्शनवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे. परंतु, दोन महिन्यांपूर्वीच या पुलाचं काम पूर्ण झालं आहे. परंतु, मंत्र्यांना वेळ नसल्यामुळे या प्रकल्पाचं उद्घाटन रखडलं आहे.
सर्व तपासण्या पूर्ण तरी उद्घाटन रखडलं
वांद्रे-कुर्ला संकुल – सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडपर्यंत विस्तारित पुलाची नागरिक अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहे. या पुलासाठी सर्व आवश्यक तपासण्या आणि सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. वाहतुकीसाठी हा पूल सज्ज आहे. परंतु, अजूनपर्यंत औपचारिक उद्घाटन समारंभासाठी तारीख मंजूर झाली नसल्याने सोहळा लांबला आहे. या विलंबामुळे मुंबईतील सर्वात व्यस्त व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलात जाणाऱ्या हजारो नागरिकांचे हाल होत आहेत.
वांद्रे पूर्व येथील कलानगर जंक्शन मुंबईतील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्र-वरळी सी-लिंक, शीव आणि इतर अनेक महत्त्वाच्या मार्गांना जोडणारं हे जंक्शन आहे. गर्दीच्या वेळी प्रत्येक दिशेने वाहनचालक या चौकात येतात. त्यामुळे तासंतास प्रवासी वाहतूककोंडीत अडकलेले असतात. हा नवा उन्नत कनेक्टर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील एक ‘मिसिंग लिंक’ आहे. या पुलावर वाहतूक सुरू झाली की ‘बीकेसी’मार्गे पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर सहजपणे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे शहारतील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांना बायपास करून थेट प्रवास करता येणार आहे.
मार्गामुळे प्रवाशांना मोठा फायदा
या पुलामुळे कलानगरवरील वाहतुकीचा भार कमी होणार असून पूर्व उपगनर, बीकेसी आणि पश्चिम उपनगरात जाणाऱ्यांच्या वेळेत बचत होणार आहे. “कलानगरमधील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही दररोज संघर्ष करतो आणि जेव्हा व्हीआयपी हालचाली होतात तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होते. पण मंत्र्यांना याची काळजी वाटत नाही,” अशी खंत जंक्शनवर तैनात असलेल्या एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने मुंबई मिररशी बोलतना व्यक्त केली. मार्ग तयार असला तरी बॅरिकेड लावून तो बंद करण्यात आला आहे.
