मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नव्या कोऱ्या गाड्यांच्या खरेदीवरून सर्वस्तरांतून टीकेची झोड उठलेली असताना ठाण्यातही महापौर, उपमहापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी महागड्या गाड्यांच्या खरेदीचा ‘टॉप गिअर’ टाकण्यात आला आहे. एकीकडे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मोठ्या प्रकल्पांच्या निधीसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र तरीही लाखोंच्या गाड्यांवरील उधळपट्टी ‘सुसाट’ असून बुधवारी, गुरुपौर्णिमेच्या मूहूर्तावर यातील काही वाहने पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला हजर झाली आहेत.
ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासाठी महिंद्रा कंपनीच्या ‘एक्सयूव्ही ७००’ या नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या. या सर्वच वाहनांसाठी एकूण ६० ते ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासाठी टोयोटा इनोव्हा वाहन खरेदी करण्यात येणार आहे. ही गाडी अद्याप महापालिकेला प्राप्त झालेली नसून ती पुढील महिन्यात महापालिकेच्या ताफ्यात दाखल होत आहे. या वाहनासाठी अतिरिक्त २० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहेत.
बुधवारी पालिका मुख्यालयात उपमहापौर व विरोधी पक्षनेत्यांची वाहने दाखल झाली. २०२१ साली अशाच प्रकारे पालिका पदाधिकाऱ्यांसाठी ७ नवीन वाहने खरेदी करण्यात आली होती. त्यासाठी जवळपास ७० लाख रुपये खर्च केले होते. आता या गाड्या पालिकेतील विविध पक्षांच्या गटनेते मंडळींना दिली जाणार असून या वाहनांचे चालक, त्यांचे वेतन तसेच इंधनाचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून होणार आहे.
उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांचे बैठकसत्र, पदाधिकाऱ्यांचा मात्र खर्च
ठाणे महानगरपालिकेच्या महसूल उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाने निश्चित महसूल उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून परिणामकारक कामगिरी करावी, असे कडक निर्देश त्यांनी दिले. एकीकडे आयुक्त राव महसूलवाढीकरिता विभागप्रमुखांना कडक सूचना देत असताना सत्ताधारी – विरोधकांना अशा महागड्या गाड्यांवर उधळपट्टीची आवश्यकता आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.
