राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत असताना यवतमाळ जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्यात आर्टिगा कार वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला, मात्र त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि दोन चिमुकल्या मुली प्राची व साची या तिघी पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्या असून शनिवारी सकाळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. या घटनेमुळे दारव्हा तालुक्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राळेगाव येथे कौटुंबिक कार्यक्रम आटोपल्यानंतर अविनाश खंडारे हे पत्नी माधवी व दोन मुलींसह नातेवाईकांना बोरीअरब इथं सोडण्यासाठी गेले होते. तेथून ते आपल्या लोणी गावाकडे परतत असताना दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असतानाही वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुराच्या पाण्याचा वेग आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने काही क्षणांतच इर्टिगा कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
कार वाहू लागल्यानंतर अविनाश खंडारे यांनी धाडस दाखवत वाहनातून बाहेर पडून जवळील झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र पत्नी माधवी आणि मुली प्राची व साची यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. तिघीही पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासून युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून नदीपात्र, किनारी भाग आणि आसपासच्या परिसरात बेपत्ता तिघींचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, बेपत्ता झालेल्या माधवी खंडारे या लोणी येथील आश्रम शाळेत मानधन तत्त्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेमुळे लोणी गावासह संपूर्ण दारव्हा तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराचे पाणी असलेल्या पुलांवरून किंवा रस्त्यांवरून वाहन नेण्याचा कोणताही धोका पत्करू नये, पाण्याचा वेग कमी होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन केलं आहे.
