अहिल्यानगर शहरालगतच्या एका नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांवर अमानुष छळाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वर्गातील दोन विद्यार्थ्यांमधील भांडणाची माहिती शिक्षकांना दिल्याचा राग मनात धरून शाळेच्या प्रिन्सिपलने संबंधित विद्यार्थ्याचा गळा पकडून हवेत उचललं, एक ते वीसपर्यंत आकडे मोजत हवेत उचलून धरलं. त्यानंतर त्याच्या हाताचा जोरदार चावा घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शाळेचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांच्याविरुद्ध बाल न्याय (जे.जे.) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मर्डर म्हणजे काय?
बुरुडगाव रोड परिसरातील समर्थनगर येथील सोनल अर्जुन शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा राजवीर (वय 8 वर्षे) हा वाळुंज येथील नालंदा शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेतो. काल गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू होता. हा प्रकार त्याने वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे वर्गात आले.
एका विद्यार्थ्याने ‘हा मला मारणार होता, मर्डर करणार होता’, असं सांगितल्यानंतर प्रिन्सिपल यांनी कोणतीही खातरजमा न करता दोन्ही विद्यार्थ्यांचे कान पिरगळले. त्यानंतर ‘मर्डर म्हणजे काय? दाखवतो’, असं म्हणत राजवीरचा गळा पकडून त्याला हवेत उचललं. सुमारे 20 सेकंद मोजल्यानंतर त्याला खाली सोडलं आणि उजव्या हाताच्या दंडाजवळ जोरदार चावा घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या चाव्यामुळे मुलाच्या हाताला जखम होऊन रक्तस्राव झाला.
‘माझ्याकडून चूक झाली आहे’
दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर मुलगा रडत असल्याचं पाहून कुटुंबीयांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी हातावर सूज, काळे-निळे व्रण, रक्तस्राव आणि ताप असल्याचं दिसून आलं. मुलाने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. घटनेनंतर प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांनी स्वतः फोन करून, ‘माझ्याकडून चूक झाली आहे. मी लेखी माफी मागतो, तुमचा पत्ता द्या’, असं सांगितलं. मात्र, एवढ्या लहान मुलाशी अशी वागणूक देणे हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
