ठाण्यात तीन हात नाक्यावरील कोंडी फुटणार, २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दीड वर्षात पूर्ण होणार

ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या वाहतूककोंडी मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी तीन हात नाका सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प शहरातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यामध्ये इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते व पायाभूत सुविधा तसेच यशवंत रामा आंतरराष्ट्रीय तरणतलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा समावेश होता.

‘मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला हा सुमारे २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हात नाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या सात प्रमुख वाहतूक प्रवाहांपैकी चार प्रवाह सिग्नलमुक्त आणि सुरळीत होतील. त्यामुळे लाखो वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत. या चौकावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून उपाययोजनांची अपेक्षा होती. मात्र, अशक्यप्राय वाटणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,’ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विकासकामांची पायाभरणी

२१ इंदिरानगरसाठी ३१ एमएलडी आणि रूपादेवीचा पाड्यासाठी एमएलडी अशी एकूण ५२ एमएलडी पाणीपुरवठा क्षमता निर्माण करण्यात आली आहे. तर रूपादेवी मंदिर परिसरातील मुलांसाठी मैदान कायम खुले राहील, या जागेवर कोणतेही बांधकाम होणार नाही, असा शब्द देत रूपादेवी मंदिर परिसर आणि हँगिंग गार्डनच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटी रुपयांची घोषणा शिंदे यांनी केली. यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरणतलाव आणि क्रीडा संकुलाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आदी उपस्थित होते.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?

युरोपीयन सल्लागारांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार करण्या येणार आहे. या योजनेत बांधकामादरम्यान आणि त्यानंतर सुरळीत वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईन, गॅस लाईन आणि इंधन नेटवर्क यांसारख्या भूमिगत सुविधांचे तपशीलवार मॅपिंग समाविष्ट आहे. सिग्नलवर केवळ १५ सेकंद विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कार्यक्रमादर्मयान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी त्यांनी ठाणे कोस्टल रोड आणि इस्टर्न फ्रीवेच्या विस्तारावरही प्रकाश टाकला. खेडा नगरपासून आनंद नगर, साकेत, गायमुख आणि फाउंटन हॉटेलमार्गे इस्टर्न फ्रीवे विस्ताराला जोडण्यासाठी एका उन्नत मार्गाची योजना आखण्यात आली आहे. अहमदाबाद, जेएनपीटी आणि मुंबईहून येणाऱ्या अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून वळवण्यासाठी हा मार्ग बांधण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *