धावताना रिक्षाची धडक, गंभीर दुखापतीमुळे ‘ब्रेन डेड’, मृत्यूशी झुंज अपयशी; आई-बापाच्या निर्णयामुळे लेक जाताना चौघांना जीवदान देऊन गेला

धावण्याचा सराव करताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३७ वर्षीय तरुणाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी नऊ दिवस शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारांदरम्यान मंगळवारी मेंदूचे कार्य थांबल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आणि त्याला मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले. अशा दुःखद क्षणी कुटुंबीयांनी तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने चार गंभीर रुग्णांना अवयव मिळाले.

धावताना रिक्षाची धडक

हा तरुण रविवारी (१९ जुलै) सकाळी राजा मंत्री रस्ता (डी. पी. रोड) परिसरातील राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यान धावण्याचा सराव करीत होता. त्याला अज्ञात रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मेंदूवरील गंभीर दुखापतीमुळे त्याच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.

कुटुंबीयांनी ठेवले दु:ख दूर

रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी त्यांना अवयवदानाचे महत्त्व आणि त्यातून इतरांना मिळू शकणाऱ्या नवजीवनाची माहिती दिली. दुःख बाजूला ठेवून कुटुंबीयांनी अवयवदानाला संमती दिली. कुटुंबीयांच्या या निर्णयानंतर मृत तरुणाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि हृदय दान केले. या अवयवांमुळे चार अत्यवस्थ रुग्णांना अवयव मिळाले.

यकृत आणि एक मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णांवर यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील रुग्णासाठी आणि हृदय तातडीने मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल रुग्णावर प्रत्यारोपित करण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून रवाना करण्यात आले.

ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कात्रज-देहूरोड बायपासवर भरधाव ट्रकने पादचाऱ्याला धडक दिल्याने अंदाजे ३० ते ३५ वर्षांच्या अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या चालकाचे नाव विठ्ठल गायकवाड (वय ३८, रा. पुरकी, चिमकी फाटा, चाकण, मूळ रा. किनाळा, जि. नांदेड) असे आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई नागेश कोळी यांनी आंबेगाव पोलिसात तक्रार दिली.

२७ जुलैला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात गस्त घालत असलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *