आयआयटी मुंबईत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवलं. या विद्यार्थ्याने मटेरियअल सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता. या विद्यार्थ्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून राजस्थानमधील त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पवई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आयआयटी मुंबईच्या वसतिगृह क्रमांक चारमध्ये राहणारा सोहिल संगवान (२०) हा विद्यार्थी मटेरियल सायन्स इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. मूळचा राजस्थानमधील पिलानी येथे राहणारा सोहिल चारच दिवसांपूर्वी घरून संस्थेत परतला होता. मंगळवारी रात्री त्याच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ उघडला जात नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी संस्था प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडून खोली उघडली असता, सोहिलने गळफास घेतल्याचे आढळले.
