राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स पाठवल्याची माहिती आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात उद्धव ठाकरेंना हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील वसंत डावखरे प्रकरणी हे समन्स पाठवल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे 5 ऑगस्टला कोर्टात हजर राहणार की वकिला मार्फत आपलं म्हणणं मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणात सहा ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टात हजर राहण्याबाबत आदेश देण्यात आल्याची माहिती आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, 2009च्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लोकसभा निवडणूक रंगली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 साली घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला. मात्र, वसंत डावखरेंनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा डावखरेंचा आरोप होता. शिवसेनेने हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली. हेच प्रकरण आता न्यायालयापर्यंत गेलं असून कल्याण कोर्टाने या संदर्भात उद्धव ठाकरेंना समन्स पाठवलं आहे.
