मुक्ता दाभोलकर यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

मुक्ता दाभोलकर यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

संबोधी प्रतिष्ठानतर्फे भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम पाच हजार, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या सहा डिसेंबरला दुपारी चार वाजता स्काऊट-गाइड जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य आण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्राचार्य होवाळे म्हणाले, ‘परिवर्तनाची चळवळ, साहित्य, कला आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांच्या गौरवार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदा पुरस्काराचे 18 वर्ष आहे. यापूर्वी डॉ. ज्योती लांजेवर, प्रा.पुष्पा भावे, मेधा पाटकर, संध्या नरे-पवार आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी सन 1996 पासून डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्ट बरोबर पंचायत राज प्रशिक्षणामध्ये काम केले आहे. एस.एन.डी.टी विद्यापीठाने ग्रामपंचायतीतील महिला सदस्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमासाठी साधन व्यक्ती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पंचायत राज प्रशिक्षण अंतर्गत ग्राम शिक्षण समिती सक्रिय करण्यासाठी 200 हून अधिक शिबिरामध्ये त्यांनी साधन व्यक्ती म्हणून काम पाहिले आहे. दापोली तालुक्‍यात कौटुंबिक हिंसाचार विरोधी गटाच्या स्थापनेतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या गटामार्फत गेल्या सात वर्षात 225 पेक्षा अधिक केसेस त्यांनी यशस्वीरीत्या हाताळल्या आहेत.‘ या पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे सचिव प्रा. रमेश जाधव, विश्‍वस्त रमेश इंजे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *