नागरिकांचा प्रवास आता सुस्साट! जुन्या मुंबई-पुणे महामार्गाबाबत मोठी अपडेट, 2030 पर्यंत…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे दहापदरीकरण सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सहापदरीकरणाची तयारी सुरू केली आहे. सध्या चार पदरी असलेला हा महामार्ग सहापदरी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. प्रकल्पासाठी सुमारे 5,000 ते 6,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे सहापदरीकरण केल्यानंतर प्रकल्पासाठी लागणारी गुंतवणूक टोलच्या माध्यमातून वसूल करण्याचा एमएसआरडीसीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सध्या 2035 पर्यंत असलेली टोल वसुलीची मुदत आणखी 10 ते 15 वर्षांनी वाढण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय डीपीआर आणि शासनाच्या मंजुरीनंतर घेतला जाणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील वाझती वाहतूक व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन लोणावळा-खंडाळा घाट परिसरात आवश्यक त्या ठिकाणी नव्या जोडरस्त्यांची उभारणी, वळणांमध्ये सुधारणा आणि मार्गाची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होऊन पुणे-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी करण्याचा उद्देश आहे.

ब्रिटिशकालीन बोरीघाट मार्गावर विकसित झालेला जुना पुणे-मुंबई महामार्ग हा अनेक दशकांपर्यंत मुंबई आणि पुणे यांना जोडणारा प्रमुख मार्ग होता. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यानंतरही या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कायम आहे. सध्या हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग-48 चा भाग असून, त्याची देखभाल एमएसआरडीसीकडे आहे.

16 पदरी मार्गांवरुन वाहतूक होणार 

जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि नव्या द्रुतगती महामार्गांवर एकत्रितपणे केल्यास दहा पदरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळं दोन्ही महामार्गाचा विस्तार झाल्यास 16 पदरी मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षात या मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. खंडाळा, लोणावळा, खोपोलीसाठी बायपास मार्ग, कळंबोली ते शिळफाटा आठपदरी रस्ता, इंटरचेंज आणि तळेगाव, खोपोली आणि खालापूरसारख्या ठिकाणांवर 13 उड्डाणपुलांचा या प्रकल्पात समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *