दिल्लीतील जंतरमंतर येथे 20 जुलै रोजी नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशातील अनेक शहरांमध्ये निघालेल्या विद्यार्थी मोर्चांमध्ये मुंबईचाही समावेश होता. मुंबईतील याच विद्यार्थी आंदोलनाचा एक चेहरा झालेल्या रिया यादव अहिरला आत्ता ऑनलाईन छळाचा सामना करावा लागतोय. दादर येथील आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या मुलांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनना रियाने एकटीने थांबवलं होतं. पोलिसांच्या व्हॅनसमोर नेटाने उभ्या राहणाऱ्या रियाचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला.
बदनामीचा सामना
अगदी परदेशी प्रसारमाध्यमांनीही हा फोटो आंदोलनाचा बोलका फोटो म्हणून वापरला. रियाच्या या धाडसाचं सर्व स्थरातून कौतुक झालं. मात्र, विद्यार्थ्यांसाठी यंत्रणेसमोर उभ्या राहणाऱ्या रियाला आता ऑनलाईन धमक्यांसहीत बदनामीचा सामना करावा लागतोय. याचसंदर्भात तक्रार नोंदण्यासाठी रिया एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलीस याप्रकरणी आता नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सोशल मीडिया अकाऊंटबद्दल खुलासा
या संदर्भात बोलताना रियाने, “माझा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मला खूप ट्रोल केलं जात आहे. माझ्या सोशल मीडिया अकाउंटबाबतही प्रश्न उपस्थित करत आहेत की हे सगळं फेक आहे. मुळात माझं अकाउंट फेक नाही. मला त्यामुळे कुठल्याही जाहिराती मिळत नाही. एका यूट्यूबरने काही चुकीचे व्हिडिओ देखील माझ्या बाबत तयार केले आहेत. जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. मी या सर्व प्रकरणी पोलिसांत तक्रार करणार आहे,” असं सांगितलं. आपले फोटो मॉर्फ करुन वापरले जात असल्याचंही रियाचं म्हणणं आहे.
पोलिसांच्या गाडीला हाताने अडवत तब्बल 40 मिनिटे रोखून धरणारी रिया आहे कोण?
नीट पेपरफुटीवरून जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनानंतर देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तरुणाई एकत्र आली. अशाच आंदोलनादरम्यान, मुंबईत दादरमधील शिवाजी पार्क येथे ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला हाताने अडवत तब्बल 40 मिनिटे एकाजागी ठामपणे उभी राहिलेली रिया यादव अहिर रातोरात सोशल मीडिया स्टार झाली. शिवाजी पार्कजवळ रियाने भर पावसात पोलिसांचं वाहन अडवलं. गाडीला एका हाताने रोखून धरणाऱ्या रियाचे फोटो व्हायरल झाले. 27 वर्षीय रिया अहिर मुंबईतील आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनसमोर उभी राहून सगळ्यांना तात्काळ सोडण्याची मागणी करताना दिसली होती. रिया अहिर अभिनेत्री असून मॉडेल आणि सूत्रसंचालिकाही आहे.
